पुण्याचे तापमान 37 अंश सेल्सिअस

उकाडा वाढला : उन्हाचा चटका कायम

पुणे – पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान तीन दिवसांपासून 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उकाडा वाढला आहे. पुढील आठवडाभर तापमानात अशाचप्रकारे चढ-उतार होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात किंचित घट तर किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्री उकाडा वाढणार आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

राज्यासह शहरामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यामध्ये शहरात कमाल तापमान 34 ते 36 अंशांवर स्थिर होते. त्यानंतर 16 मार्चला त्यात वाढ होत 37 अंशांच्या पुढे पोहोचले आहे.

सकाळी नऊ-दहापासूनच उन्हाचा चटका जाणवतो आहे. दुपारी उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने अनेक जण घराबाहेर पडणे टाळत आहेत. घर, कार्यालयांमध्ये पंखे किंवा वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढला आहे. कमाल तापमान या आठवड्यामध्ये काहीसे कमी होणार आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात वाढ होणार आहे.

राज्यात उन्हाचा चटका कायम
राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर आणि नाशिक वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 36 ते 39 अंशांवर आहे. मराठवाड्यात औरंगाबाद येथे 36.6 अंश कमाल तापमान नोंदविले गेले. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागांत कमाल तापमान 37 अंशांपुढे नोंदविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)