पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव 

मागणीही वाढली : मार्केटयार्डात दररोज 5 ते 6 टन आवक; बाजारात किलोस 20 ते 70 रुपये भाव 

पुणे:ड्रॅगन फ्रुटची आता पुणेकरांना भुरळ पडली आहे. आरोग्यास लाभकारक या फळाला मागणी वाढली आहे. पेशी वाढविण्यासाठी विशेषत: ड्रॅगनचे सेवन केले जाते. त्याचबरोबर डेंग्यू, दमा, कर्करोगासह इतर आजारांवर ते गुणकारी मानले जाते. ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. सध्या मार्केटयार्डातील फळ विभागात दररोज तब्बल 5 ते 6 टन इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

विशेषत: सातारा जिल्ह्यातील फलटण, पुणे जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागांतून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. दर्जानुसार प्रतिकिलोस 20 ते 70 रुपये भाव मिळत आहे. लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल ड्रॅगन फ्रुटला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. ड्रॅगन फ्रुट उत्पादक शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईसक्रीम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेऊन या फळावर प्रक्रिया करुन काय करता येईल, यावर विचारमंथनही केले आहे.

ड्रॅगन फ्रुटबद्दल थोडक्‍यात… 

ड्रॅगन फ्रुटचे उगमस्थान अमेरिका आहे. यासह थायलंड, मलेशिया, व्हियतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ड्रॅगन फ्रुट हे व्यापारी पीक म्हणून यशस्वीरित्या घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशांमध्ये याचे उत्पादन घेतले जात आहे. ड्रॅगन फ्रुटची चव साधारण किवी या फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)