लोकसभा2019 : मावळचा सस्पेन्स शरद पवारांकडून कायम

-पुन्हा गुगली : पक्षाचा उमेदवार विजयी करा

-शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी कॉन्फरन्सद्वारे संवाद

पिंपरी – मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचा, असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. “पार्थला नेते म्हणून दिले आहे, त्यांना मावळमधून 100 टक्के निवडून आणू’ या कार्यकर्त्यांच्या वक्‍तव्यावर शरद पवार यांनी राजकीय गुगली टाकत, मावळचा राष्ट्रवादीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही, असे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगत मावळच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (दि. 13) मुंबईतील प्रदेश कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी पवार बोलत होते.

दोन दिवसांत मावळचा उमेदवार – पार्थ पवार

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला मावळ लोकसभेचे प्रबळ
दावेदार पार्थ पवार हे आवर्जून उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, मला माहित आहे, तुम्हाला काय विचारायचे आहे असे सांगत, दोन -तीन दिवसांत मावळचा उमेदवार जाहीर होईल, असे सूचक विधान करत प्रसारमाध्यमांना आणखी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

वाकड येथील यशोदा गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कॉन्फरन्सिंगला पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये शरद पवार यांनी अगदी केंद्र शासनापासून पिंपरी-चिंचवड पालिकेतील कारभाराबाबतच्या विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नगरसेवक मयूर कलाटे यांनी सोशल मीडियाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर शरद पवार गंभीर झाले. सोशल मिडीयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नवीन पिढी मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. मोबाईलवर येणारी एखादी चुकीची बातमी वेळीच खोडून काढा, त्याला उत्तर दिले गेले पाहिजे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. मात्र हे करत असताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याचीदेखील खबरदारी घेतली पाहिजे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून बूथ कमिटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच बूथ कमिट्यांच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावर शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

इव्हीएममध्ये घोटाळा असू शकतो

राष्ट्रवादीच्या काळात पुण्यापेक्षाही पिंपरी-चिंचवडचा अधिक आणि वेगाने विकास झाला. विकासकामे केल्यानंतरही राष्ट्रवादीचा पराभव झाला ही बाब आपण मान्य केली मात्र कदाचित इव्हीएममध्ये घोटाळा असू शकतो, असे सूचक विधान केले. भाजपा निवडणुका जिंकत असताना असताना इव्हीएममध्ये घोटाळा करत असल्याचा संदेश पवारांनी यावेळी दिला.

सध्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेय व वादविवाद सुरू आहे. त्यामुळे त्यांचे सामाजिक प्रश्‍नांकडे लक्ष नाही. या सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाखूष आहेत. ते संधीच्या शोधात आहेत. शहराच्या विकासात राष्ट्रवादीच्या सहभागाच्या विकासकामांची माहिती तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवा, नागरिक पुन्हा तुम्हाला निवडून देतील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)