अंधश्रद्धेचे अजुनही मानगुटीवर

करपेवाडीतील घटनेचा गुंता कायम…

ढेबेवाडी  – पाटण तालुक्‍यातील करपेवाडी येथील भाग्यश्री माने हिचा खून अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय पुढे येत आहे. या घटनेने अनेकांचे मन सुन्न झाले आहे. शिक्षणाने लोकं सुशिक्षित झाली तरीही काहींची मने आजही अंधश्रद्धेने बुरसटलेली आहेत. अंधश्रद्धचे भूत मानगुटीवर बसलेल्या लोकांचे मन अघोरी कृत्य करताना जराही कचरत नाही. नरबळीचा प्रकार होताना माणूस पोटच्या गोळ्याचाही विचार करत नाही. करपेवाडीतील या घटनेने गुंता आणखी वाढत चालला असून पाटण तालुकाच नव्हे तर संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र हादरून गेला आहे.

करपेवाडी येथील भाग्यश्री मानेचा खून अंधश्रद्धेतून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जर हा नळबळीचा प्रकार असेल तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना म्हणून याचा उल्लेख केला जाईल. याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्रीचे वडिल संतोष माने यांना अटक केली आहे. घडल्या प्रकरणी कायदा आपले काम करेल गुन्हेगारांना शिक्षा होईल पण या घटनेमुळे अंधश्रद्धेचे भूत काही लोकांच्या मानगुटीवर कायम असल्याचे स्पष्ट होत आहे

अंधश्रद्धा संपावी यासाठी आयुष्यभर जागृती करून अंधश्रद्धेविरुद्ध कायदा होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जिल्हा म्हणून आपणास अभिमान वाटतो.पण अजूनही या अंधश्रद्धेच्या विळख्यातून जनता सुटलेली नाही, हे यावरून स्पष्ट होते. ढेबेवाडी, तळमावले विभाग हा ग्रामीण आहे. या विभागातील भोळ्या भाबड्या जनतेचा भोंदूबाबा गैर फायदा घेत आहेत. अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. अंगात आल्यावर रोग बरा करतो, धन मिळवून देता, असे सल्ले देणाऱ्या भोंदूचा सुळसुळाट आहे. त्याच बरोबर प्रत्येकाच्या घरी काहीना काही अडचणही असतेच. त्याचाच हे भोंदू फायदा उटवत असतात. लग्न जमेत नसेल, धंदा होत नसेल, घरात वाद होत असतील, महत्वाचे काम होत नसेल, अंगारे धुपारे घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातूनच कोंबडी-बकरी यांचे बळी दिले जात आहेत.

करपेवाडी येथील खून प्रकरणाला याचीच किनार असून नरबळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेमुऴे संपूर्ण विभागाला मोठा धक्का बसला असून अंधश्रद्धेच्या जोखडातून समाज्याची सुटका होणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे माणूस चंद्रावर पोहचला असताना अंधश्रद्धेच्या जाळ्यात विज्ञान चाचपडत आहे. या विकृत कृत्यांना सुशिक्षितही बळी पडत आहेत. नरबळीच्या प्रकारामुळे समाज व्यवस्था हादरुन जात आहे. या घटनेला वेळीच वेसन घालायची असेल तर अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन होणे गरजेचे आहे. ही मशाल मनामनात पेटायला हवी. भोंदू बांबाची पाळेमुळे उपटून टाकायला हवीत. त्यासाठी शासनाने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी. तरच अंधश्रद्धेच्या थोंटाडांचे उद्दात्तीकरण थांबवण्यात यश येईल. तरच समाज या जोखाड्यातून बाहेर येण्यास मदत होईल. नाहीतर आणखी एखादा नरबळी जाईल.

भोंदुगिरीचा सुळसुळाट…

ढेबेवाडी व आजुबाजुच्या परीसरात देवाच्या नावाखाली भिती दाखवून लोकांना लुबाडण्याचे प्रकार काही भोंदू लोक करत आहेत. या लोकांकडे आठवड्यातील काही ठराविक दिवशी लोकांची वर्दळ असते. अशा भोंदुगिरी करणारांच्या मुसक्‍या आवळायला हव्यात अशा प्रतिक्रीया लोकांच्यातून उमटत आहेत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)