ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलंड संघांदरम्यान होत असलेल्या सराव सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्नधार स्टिव्ह स्मिथने यशस्वी पुनरागमन केले असून त्याने न्युझीलंड संघासोबतच्या सराव सामन्यात नाबाद 91 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर केवळ 2 धावा करुन परतल्याने त्याची अपयशी सुरूवात झाली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 9 बाद 286 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 44 षटकांत 5 बाद 248 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमामुसार ऑस्ट्रेलियाचा संघ 16 धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले.
या सामन्यात डेव्हीड वॉर्नरला उस्मान ख्वाजासह सलामीला संधी मिळाली, परंतु अवघ्या दोन धावा करून तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मिथने संयमी खेळ करतान ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. त्याला शॉन मार्श (32) आणि मॅक्सवेल (70) यांनी उत्तम साथ दिली. स्मिथने 108 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 91 धावा केल्या. मॅक्सवेलने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 70 धावांची आक्रमक खेळी केली. स्मिथने याआधीच्या सामन्यात 89 धावांची खेळी केली होती. त्याने सराव सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावत विश्वचषक स्पर्धेपुर्वी लयीत परतल्याचे दाखवून दिले आहे.