पार्थच्या पराभवाने कोल्हेंचे यश झाकोळले

कार्यकर्ते गायब ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दिसला नाही उत्साह

कार्यकर्त्यांची नगण्य उपस्थिती

गुरुवारी  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, तरी देखील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्य होती. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी केलेल्या स्वतंत्र व्यवस्थेच्याठिकाणी केवळ पोलिस कर्मचारी आणि चार-दोन कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उन्हाच्या झळा वाढत असतानाच हे कार्यकर्ते आणि पोलिसदेखील सावलीचा आडोसा घेत अन्यत्र बसकन मांडली होती. व्हीआयपी पार्किंग तर पूर्णपणे रिकामी होती.

पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांच्या दारूण पराभवामुळे सर्व देशाचे लक्ष मावळ लोकसभा मतदार केंद्रावर केंद्रीत झाले आहे. मात्र, पंधरा वर्षानंतर शिरूर लोकसभेतील शिवसेनेचा अश्‍वमेध रोखणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या यशाचे मात्र फारसे कौतुक होताना दिसले नाही. घरी बसून माहिती घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्येच निकालाचा कल लक्षात आल्याने ते बालेवाडी स्टेडियममधील मतमोजणीकडे फिरकले नाहीत. तर कोल्हे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अगदी बोटांवर मोजण्याऐवढे कार्यकर्ते उपस्थित होते.

बालेवाडी स्टेडियम नजीकच्या एका हॉटलेमध्ये बसूनच डॉ. अमोल कोल्हे निकालाची माहिती घेत होते. विजय दृष्टीक्षेपात येताच ते मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या विजयाला अधिकृत दुजोरा मिळताच ते मतमोजणीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. बालेवाडीच्या स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर त्यांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत, भंडाऱ्याची मुक्‍त उधळण करत, राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. दुपारी चारनंतर कोल्हे यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत विजयी मिरवणुकीकडे रवाना झाले.

बालेवाडी स्टेडियममधून निकालाची घोषणा होत असताना, पार्थ पवारच्या पराभवाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कल्पना आली. मात्र, फेऱ्यांनुसार मताधिक्‍क्‍याची आकडेवारी वाढत गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोल्हेंच्या विजयाचा आनंद झाला होता, मात्र, पार्थच्या पराभवाची नाराजी देखील लपविता येत नव्हती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)