“त्या’ विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ संवेदनशील

रिफेक्‍टरीप्रकरणी कुलगुरूंची माहिती

पुणे –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्‍टरीप्रकरणी (भोजनालय) गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ प्रशासन संवेदशनील असून, त्यांच्याबाबत सहानुभूतीची भूमिका आहे. याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी सभागृहात दिली.

रिफेक्‍टरीच्या जेवणात काही दिवसांपूर्वी अळ्या निघाल्या होत्या. त्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा सुधारावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना रिफेक्‍टरीची तोडफोड झाली. यात विद्यापीठाचा कर्मचारी जखमी झाला होता. त्याच्या तक्रारीनंतर 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत दादाभाऊ शिनलकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून, त्यांच्यावर झालेल्या गुन्हेबाबत विद्यापीठाने मागे घ्यावी, असा स्थगन प्रस्तावाद्वारे लक्ष वेधले. या चर्चेत शशिकांत तिकोटे, शामकांत देशमुख, बागेश्री मंठाळकर यांनी सहभाग घेतला.

याबाबत कुलगुरू म्हणाले, “रिफेक्‍टरी आंदोलनावेळी विद्यापीठाचा कर्मचारी जखमी झाला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. विद्यापीठाकडून जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी कर्मचाऱ्याचा विद्यार्थ्यांवर रोष नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाने त्यांच्याबाबत सहानुभूतीची भूमिका घेतली आहे. असे नसते, तर विद्यापीठ प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात ठोस मांडली असती. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी माजी कुलगुरू याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल.’ “या प्रकरणात कोणत्याही निष्पाप विद्यार्थ्यावर कारवाई होणार नाही याची काळजी घेण्यात येईल,’ असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनीही “या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये,’ असेही नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)