आज राज्याचा शेवटचा अर्थसंकल्प

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणांची शक्‍यता

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प उद्या (मंगळवार) विधिमंडळात सादर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणा करून विविध घटकांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे राज्यातील नागरिकांबरोबरच राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

उद्या दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील. यापार्श्वभूमीवर दोनही मंत्र्यांनी सोमवारी अतिरिक्त अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 अशा चार महिन्यांसाठी लागणार्या आवश्‍यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांना भरभक्कम निधी देण्यात आला होता. मात्र, सरकारने त्यावेळी लोकप्रिय घोषणा करण्याचे टाळले होते.

येत्या आँक्‍टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी, कामगार तसेच विविध सामाजिक समूहांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिल. सरकारने शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. तरीही सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत आहे. ही मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकर्यांना दिलासा देणार्या घोषणा होऊ शकतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here