विटा-महाबळेश्‍वर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ

लवकरच महामार्गाचे काम सुरू होणार : चोराडे, वडगाव, रहाटणी, पुसेसावळी गावांचे भाग्य उजळणार

म्हासुर्णे – सातारा जिल्ह्यात नव्याने मंजूर करण्यात आलेला महाबळेश्‍वर-विटा महामार्गामुळे खटाव तालुक्‍यातील औद्योगिक विकासापासून वंचित असलेल्या चोराडे, वडगाव, रहाटणी, पुसेसावळी या गावांचे भाग्य उजळणार असून या महामार्गामुळे या ठिकाणी औद्योगिक वाढीची चालना मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ झाला आहे.

सातारा, सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या गावांना आजपर्यंत रस्त्यांच्या बाबतीत कायम मागास असलेला हा भाग आहे. आजवर या भागातून एकेरी रस्ता जात होता. त्यामुळे अनेकवेळा खराब रस्त्यांचे कारण पुढे करून एसटी बसेसही बंद केल्या होत्या. या मार्गावर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्‍याच बसेस दिवसभर धावतात. त्यामुळे अनेक वेळा सातारा-सांगली कराडहून येताना प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांचाही आधार घ्यावा लागत आहे.
या गावांपासून एक-दोन किलोमीटरवर सांगली जिल्हा आहे.

या ठिकाणी रस्त्यांचा दर्जा व औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पण खटाव तालुक्‍यातील या गावांमध्ये आजवर कोणताही विकास झाला नाही. त्यामुळे महाबळेश्‍वर-विटा महामार्गाचे काम सुरू झाल्यामुळे या भागाचा कायापालट होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. विशेष करून चोराडे, रहाटणी, वडगाव या खेडेगावातून जात आहे. त्यामुळे या भागाचे भाग्य उजाळणार असल्यामुळे इथल्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाबळेश्‍वर विटा रस्ता मंजूर झाल्यानंतर काही दिवसात रस्त्याचे मोजमाप पूर्ण होऊन काम सुरू झाले. परंतु रस्त्याकडेच्या नागरिकांची घरे पाडण्याच्या सूचना बांधकाम विभागांकडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी बांधकामे काढली आहेत. काढलेल्या बांधकामांना शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.

– श्रीकांत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य, चोराडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)