“फलटण शुगर्स’बाबत सर्वमान्य तोडगा हवा

ना. रामराजे : थकीत देण्यांबाबतचे अधिकार एनसीएलटीकडे

फलटण – साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुग वर्क्‍सच्या थकीत रक्कमेसाठी संबंधीतांनी न्यायालय, शासन किंवा अन्य ठिकाणी दाखल केलेले दावे, तसेच कारखान्याच्या स्थावर, जंगम मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण प्रक्रिया स्थगित केली आहे. कारखान्याकडून ही वसूली नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल मुंबई बेंचच्या माध्यमातून होणाऱ्या निर्णयाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती अवसायक विश्राम नारायण पंचपोर यांनी दिली. दरम्यान, याप्रश्‍नी सर्वमान्य तोडगा काढण्याची गरज असून त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

न्यू फलटण शुगर वर्क्‍स लि.,साखरवाडी या साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामातील उसाचे संपूर्ण पेमेंट सुमारे 48 कोटी व त्यावरील व्याज, कामगारांचे पगार व अन्य देणी दिली नाहीत. तसेच विविध बॅंका, वित्तीय संस्था, शासकीय देणी अशी सुमारे 225 कोटी थकीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉसमॉस बॅंक लि. (पुणे) यांनी एनसीएलटीकडे अर्ज केल्यानंतर तेथे झालेल्या निर्णयानुसार पंचपोर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार उपस्थित होते.

यावेळी येणे रक्कमांची माहिती देण्याबाबत दि.24 फेब्रुवारी आवाहन कले होते. दाखल अर्जांची छाननी दि.13 मार्चपर्यंत पूर्ण केली आहे. आता उर्वरित येणे रक्कमांच्या मागणीसाठी सेवा व वस्तू पुरवठादार (ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी) यांनी फॉर्म ब व ड मध्ये संपूर्ण माहिती भरुन दि.21 मे पर्यंत आपल्याकडे दाखल करावे. त्याची पडताळणी दि.28 मे पर्यंत करुन अहवाल पुर्नवसन समितीसमोर ठेवून ही संपूर्ण प्रक्रिया 180 दिवसांत म्हणजे दि.19 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पंचपोर यांनी स्पष्ट केले.

न्यू फलटण शुगर वर्क्‍सची स्थावर व जंगम मालमत्ता आता पूर्णपणे एनसीएलटीच्या ताब्यात असून त्याबाबत अन्य कोणाचे अधिकार राहिले नाहीत. मालमत्तेचे भाडे वसूलीचे अधिकारही कोणाला नसूल याबाबत कसलेही न्यायालयीन आदेश, सूचना अथवा तत्सबंधीची कोणतीही प्रक्रिया बंधनकारक राहिली नाही. न्यू फलटण शुगर वर्कस्‌च्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक संघटना, व्यक्ती प्रयत्नशील आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र, कायद्याच्या चौकटीत बसवून आणि सर्वमान्य जो तोडगा असेल त्याच्या पाठीमागे सर्वांनी राजकारण दूर ठेवून एकत्र आल्यानंतरच या प्रश्‍नाची सोडवणूक समाधानकारक होणार आहे. यासाठी भक्कम गुंतवणूकदाराचा शोध घेवून त्याची सर्वमान्यता तपासल्यानंतरच त्याच्यावर पुढील जबाबदारी सोपविण्याबाबत सुतोवाच यावेळी ना. रामराजे यांनी केले. उत्पादित ऊसाच्या गाळपासाठी हा साखर कारखाना सुरू राहिला पाहिजे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. ना. रामराजे या प्रश्‍नात योग्य तोडगा काढतील असा विश्‍वास संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)