युपीत कॉंग्रेसला वगळून सप-बसपची आघाडी

भाजपाविरोधात महाआघाडीच्या प्रयत्नांना खिळ

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची चिन्हे आहेत. कारण उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला डावलून मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सप-बसप यांची जागावाटपाबाबत बोलणीही पार पडल्याची माहिती आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलालाही महाआघाडीत सोबत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसप 38, समाजवादी पक्ष 37, तर रालोद तीन अशा 78 जागांवर निवडणूक लढवणार आहे. कॉंग्रेसचा सहभाग नसला, तरी रायबरेली आणि अमेठीतून महाआघाडी उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत.

रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदारकी मिळवली आहे, तर अमेठीतून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सलग तीन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. महाआघाडीत हे दोन मतदारसंघ वगळता सर्व जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत.
मायावती आणि अखिलेश यांच्या मनात कॉंग्रेसविषयीची खदखद काही दिवसांपासून वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, सप आणि बसप स्वतंत्र लढले होते. मात्र कॉंग्रेसला तीन राज्यात मिळालेल्या विजयानंतर मायावतींनी त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पाठिंबा दिला. तर अखिलेश यांनी मध्य प्रदेशात समर्थन दिले होते.

दुसरीकडे, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार मानायला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी नकार दिला आहे. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी सांगितले. द्रमुकचे एम के स्टॅलिन यांनी काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधी हे महाआघाडीचे नेतृत्व करतील, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीलाही स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला होता. परंतु प्रत्येकाचे मत हे स्टॅलिन यांच्यासारखं का असावे? असा सवालही अखिलेश यांनी विचारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)