प्राधिकरणाचा सौरऊर्जा प्रकल्प आठ महिन्यांपासून बंद 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सौरऊर्जा प्रकल्प इन्व्हर्टरअभावी गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान दोन इन्व्हर्टर खरेदी करण्यासाठी फेरनिविदा प्रसिद्ध झाली आहे. आठवडाभरात ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर तातडीने इन्व्हर्टर खरेदी करून हा प्रकल्प पूर्ववत सुरू होईल.

प्राधिकरणाने 2012 मध्येसौरऊर्जा प्रकल्प विकसित केला. फेब्रुवारी 2013 मध्ये त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला. प्रकल्पाच्या माध्यमातून दर तासाला सरासरी 100 किलोवॉट एवढी वीजनिर्मिती होते. प्रकल्पासाठी 1 कोटी 87 लाख इतका खर्च झाला. कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा आणि लिफ्ट ही सौरऊर्जेवर आहे. सौरऊर्जेमुळे वीज बिलासाठी प्राधिकरणाला दरमहा फक्‍त 15 हजार इतका खर्च करावा लागतो. मात्र, नोव्हेंबर 2018 मध्ये या प्रकल्पाचा इन्व्हर्टर नादुरूस्त झाला. तेव्हापासून दरमहा दीड लाख रुपये वीज बिल भरावे लागत आहेत.

या प्रकल्पासाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्राप्त झालेल्या निविदांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे आता पुन्हा फेरनिविदा प्रसिद्ध केली आहे. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर म्हणाले, ”इनव्हर्टरअभावी सध्या प्राधिकरणाचा सौरऊर्जा प्रकल्प बंद आहे. इनव्हर्टर खरेदीसाठी आवश्‍यक निविदा प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर, तातडीने इन्व्हर्टर खरेदी करून सौरऊर्जा प्रकल्प पुर्ववत सुरू केला जाईल.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)