उत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या “त्या’ नगरसेवकांचे मौन

करमणूक कराची वसुली दोन वर्षांपासून ठप्प : महापालिकेचे सात ते आठ कोटींचे नुकसान- नळकांडे

नगर  – गेल्या दोन वर्षांपासून करमणूक कराची वसुली ठप्प असल्याने महापालिकेचे तब्बल सात ते आठ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाईची कारवाई करून त्यांच्या पगारातून ही रकम वसुली करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक शाम नळकांडे यांनी केली. या मागणीवरून खुद्द महापौरांसह शिवसेनेचे अन्य नगरसेवक आक्रमक झाले असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या नगरसेवकांनी मात्र मौन पाळले.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची महासभा झाली. त्यावेळी करमणूक कराचा मुद्दा नळकांडे यांनी उपस्थित केला. एरवी राष्ट्रवादीचे हे नगरसेवक प्रत्येक मुद्दयावर प्रशासनाची कोंडी करण्याच्या प्रयत्न करतात. परंतु महापालिकेच्या उत्पन्न वाढीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या नगरसेवकांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली. पहिल्या रांगेत बसून प्रत्येक प्रश्‍नांचा किस पाडण्याचा हे चारही नगरसेवक प्रयत्न करतात. मात्र आज महापालिकेच्या करमणूक करातून महापालिकेचे मोठे उत्पन्न बुडाले असून प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही बाबत समोर येवून देखील या नगरसेवकांनी मौन पाळले. त्याबद्दल महापालिका वर्तूळात उलटसुलट चर्चा आहे.

सन 2017 मध्ये महसूल विभागाकडे असलेल्या करमणूक कराच्या वसुलीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आली. ग्रामीण भागात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्याकडे तर शहर भागात नगरपालिका व महापालिके ही जबाबदारी देण्यात आली. महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. वर्षभरापूर्वी करमणूक कर कक्ष स्थापन करण्यात आला. परंतु त्या ठिकाणी नियुक्‍त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नसल्याचे आजच्या सभेत समोर आहे. कोणाकडून वसुली करावी लागणार?

किती टक्‍के कर आकारणी करावी लागणार? याबाबत संबंधित अधिकारी निरुत्तर ठरला. त्यामुळे नळकांडे यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर ठरले. श्रीगोंदे नगरपालिकेने या कराची वसुली सुरू केली आहे. पण महापालिकेला कर वसुली करता आली नाही. दोन वर्षात या कराची वसुली न झाल्याने महापालिकेला तब्बल सात ते आठ कोटींचे नुकसान झाले असून एवढ्या उत्पन्नाला मुकावे लागले असल्याचे सांगून नळकांडे याला जबाबदार धरून अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. परंतु राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने कारवाई ऐवजी यापुढे वसुली करून असे सांगून हा विषय संपवा असे मत व्यक्‍त केले. अन्य नगरसेवक तर याबाबत गप्प होते.

काही विषयावर हे नगरसेवक तुटून पडतात. पण आज महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या मुद्दया महत्वाचा होता. नगर शहरात अनेक मनोरंजन मेळा होतात. याला कोणाचा आशीर्वाद आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते शरण मार्केट पाडल्याने आक्रमक झाले. महापौरांना मुद्दे पडून देवून निर्णय देखील घ्यायला लावला. पण उत्पन्न वाढीच्या मुद्‌द्‌यावर त्यांनी मौन पाळले. भाजपचा एक नगरसेवक यावर बोलला. महापौरांनी देखील आयुक्‍तांना ही गंभीर बाबत असून याकडे लक्ष देण्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)