नवी दिल्ली – बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था समोरील भांडवल उपलब्धतेचा प्रश्न वाढत चालला आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे डीएचएफएल या कंपनीचा शेअर गुरुवारी 16 टक्क्यांनी कोसळला आणि 52 आठवड्याच्या नीचांकी पातळीवर गेला.
या कंपनीचे पतमानांकन इक्रा आणि क्रिसील या पतमानांकन संस्थांनी कमी केले आहे. बॅंकांबरोबरच एनबीएफसींचा भांडवल असुलभतेनेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात ठोस असे काही केलेले नाही.
पतधोरण जाहीर केल्यानंतर बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आमचे एनबीएफसी आणि घरासाठी कर्ज देणाऱ्या संस्थांच्या कामकाजाकडे बारीक लक्ष आहे. रिझर्व्ह बॅंक वित्तीय स्थिरता ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळोवेळी करील मात्र त्यांच्या या वक्तव्यावर गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करून जोरदार विक्री केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. त्यामुळे पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेला आणि केंद्र सरकारला काही तरी ठोस उपाय योजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा एनबीएफसीचे प्रश्न वाढण्याची शक्यता आहे.