हायकोर्टात तपास यंत्रणांचा दावा : लवकरच छडा लावणार
मुंबई- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यास पाच वर्षे अपयशी ठरलेल्या सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांना या दोन्ही प्रकरणातील समान दुवा सापडला असून येत्या पंधरा दिवसांत त्याचा छडा लावला जाईल, असा दावा आज उच्च न्यायालयात केला. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी सीबीआयच्या वतीने सॅलीसीटर जनरल अनिल सिंग यांनी गेल्या आठवड्यात डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात नव्याने अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपीकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दोन्ही हत्याकांडातील समान दुवे सापडलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल खाडीत फेकल्याची माहिती दिली आहे.
हे हत्यार शोधून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळाल्या असून लवकरच या कामाला सुरूवात करण्यात येईल. येत्या 14 दिवसांत या दोन्ही प्रकरणात एक मोठे ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
तसेच मागिल सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मुख्य सचिवांना दिलेल्या निर्देशांनुसार गृह आणि अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांनी याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकित या दोन्ही तपासात सीबीआय आणि एसआयटीला सर्वतोपरी सहाय्याची तयारी करण्या संदर्भात आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. या संदर्भात न्यायालयाने भाष करण्यास टाळले असले तरी पानसरे हत्याप्रकरणात मुख्य सुत्रधारचा पत्ता नाहीच. परंतू मारेकऱ्याचा शोध घेण्यास एसआयटीला अद्याप यश न आल्याने तिव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून याचिकेची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.