एसटी स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर

-“आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी अवस्था
– सुरक्षेसंबंधी व्यवस्था करण्याबाबत अनास्था
 
पुणे – दररोज लाखो प्रवाशांचा राबता असलेल्या एसटी महामंडळाच्या बसस्थानकांची अवस्था “आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी झाली. त्यामुळे पुणे विभागातील तब्बल तेरा डेपोंमधील प्रवासी “रामभरोसे’ प्रवास करत असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा या मार्गावरील एसटी बसमध्ये “आयईडी’ बॉम्ब सापडल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्‍वभूमीवर एसटी बसस्थानके आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे विभागाच्या अखत्यारीत शिवाजीनगर, स्वारगेट, बारामती, सासवड, भोर, दौंड, इंदापूर, शिरुर, नारायणगांव, राजगुरुनगर, पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आणि तळेगांव दाभाडे ही तेरा स्थानके असून अन्य छोटी स्थानके येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बसस्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे सर्वांधिक गर्दीची ठिकाणे असल्याने बसस्थानकांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी आणि परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचना राज्य शासन आणि गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

“त्या’ निर्णयाचे काय झाले…
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वेप्रमाणेच “प्लॅटफॉर्म तिकिट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची केवळ घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षभरात असे प्लॅटफॉर्म तिकिट नसलेल्या एकाही प्रवाशावर महामंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली नाही.
 
खासगी बसेसच्या चालकांची एजंटगिरी…
खासगी बसेसच्या एजटांना बसस्थानकांच्या आत आणि आवारात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही हे एजंट नियम बासनात गुंडाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून बिनधास्तपणे स्थानकाच्या आवारात घुसून अरेरावी करत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यात रिक्षावाले आणि टुरिस्ट कारचालक एसटी स्थानकांच्या आवारात घुसून प्रवासी पळवल्या जात आहेत.
 
बॅग्ज स्कॅनर, मेटल डिटेक्‍टरचे काय?
सर्व स्थानकांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्‍टर बसविण्याच्या सूचना राज्य शासनाने एसटी महामंडळाला केल्या होत्या. शिवाय, प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी बॅग्ज स्कॅनर बसविण्यात यावेत, असेही आदेश दिले होते. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला होता. त्यानुसार ही यंत्रणा बसविण्यातही आली होती. मात्र, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे या यंत्रणेचा वापर करण्यात आला नाही. त्यानंतर ही यंत्रणा अक्षरश: धूळखात पडून आहे.
 
नो पार्किंग, नो व्हॉल्टिंगचा बोजवारा…
बसस्थानकांच्या परिसरात खासगी वाहनांना थांबण्यासाठी “नो व्हॉल्टिंग’ आणि “नो पार्किंग’ असा नियम करण्यात आला आहे. मात्र, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने बिनधास्त याठिकाणी उभी राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे रिक्षावाले अस्ताव्यस्त उभे राहात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या समोर घडत असतानाही ते कोणतीही कारवाई करत नाहीत.
 
बसस्थानकांवर पुरेसी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याशिवाय खासगी वाहतूकदारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्याकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. कोणतेही निनावी पार्सल न स्वीकारण्याच्या सूचना पार्सल विभागाला दिल्या आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
– यामिनी जोशी, विभागीय नियत्रंक, एसटी महामंडळ, पुणे
 
विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आगार प्रमुखांना सुरक्षेच्या संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रवासाच्या दरम्यान कोणतीही व्यक्ती, त्यांच्याकडील सामान संशयित असल्याची शंका आल्यास त्यांची तपासणी करण्याच्या सूचना सर्व चालक आणि वाहकांना देण्यात आल्या आहेत.
– एस. एम. तिकोटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे विभाग, एसटी महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)