श्रीनगर – भारतीय भूसेनेची वाहने ज्यावेळी काश्मीरमध्ये रस्त्यांवरून किंवा राजमार्गांवरून मार्गक्रमण करीत असतात, तेव्हा खासगी किंवा इतर वाहनांना त्याचवेळी त्या मार्गांवरून जाता येत नाही, असा नियम आहे. आता हाच नियम केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांसाठीही लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे.
सीमा सुरक्षा दलालाही भारतीय सेनेप्रमाणेच सुरक्षेचे काही नियम लागू करावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यात महामार्गांचा उपयोग सेनेप्रमाणे करण्याचा अधिकारही समाविष्ट होता. राजनाथसिंह यांनी त्वरित ही मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार घोषणा केली.
या घोषणेमुळे या दलाची सुरक्षितता आता अधिक वाढणार आहे. सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना अत्याधुनिक गुणवत्तेची शस्त्रे द्यावीत असेच प्रशिक्षणाची व्यवस्था अद्ययावत असावी, अशी मागणीही अनेक दशकांपासून होत आहे. आता सरकारला या मागण्यांचा विचार गांभीर्याने करावा लागेल, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.