पुणे मनपा कॉलनीतील इमारतीचे छत कोसळले

अंबिल ओढा येथील घटना : वसाहतीला पालिकेची नोटीस

पुणे – अंबिल ओढा येथील महापालिका कर्मचारी वसाहतीमधील एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. महापालिकेने या वसाहतीला नोटीस बजावली आहे. कामगारांनी त्वरित वसाहत रिकामी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या भवन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये पालिका कामगारांच्या 26 इमारती आहेत. यापैकी 4 इमारती धोकादायक बनल्या आहेत. महापालिकेने बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा ता तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येथील कर्मचारी ही जागा सोडण्याला तयार नसून या सदनिका नावावर करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

अंबिल ओढा येथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांची इमारत धोकादाय झाली असल्याची नोटीस देण्यात आली आहे. येथील धोकादायक झालेल्या इमारतीमध्ये 24 सदनिका आहेत. मात्र, हे कामगार वसाहत सोडण्याला तयार नाहीत. येथील घरे नावावर करावीत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. महापालिका प्रशासनाचे असे धोरण नसल्यामुळे ही घरे नावावर होऊ शकत नाहीत. अशाच प्रकारची परिस्थिती वाकडेवाडी येथील कामगार वसाहतींची आहे. येथील तीन इमारती धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी महापालिका तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यास तयार आहे. असे असले तरी येथील कामगार सदनिका सोडण्यास तयार नाहीत, अशी प्रतिक्रिया भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके यांनी दिली.

पोलीस बंदोबस्तात चाळ रिकामी करण्याचे आदेश
अंबिल ओढा येथे स्लॅबचा काही भाग पडल्यानंतर महापालिका आयुक्‍तांनी यासंदर्भात बैठक घेतली. प्रशासनाला तत्काळ याठिकाणची रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या. येथळ नागरिकांनी विरोध केल्यास पोलीस बंदोबस्तामध्ये चाळ रिकामी करण्यात येणार आहे. कात्रज येथील महापालिकेच्या सदनिकांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

3,500 कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा यादी
शहरातमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 3,400 खोल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त होऊनही या सदनिका सोडल्या नाहीत. महापालिका प्रशासनाकडे 3,500 कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा यादी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून महिन्याला 24 रुपये भाडे आकारते. बुरूड चाळ, कासेवाडी, अक्षय गार्डन, संभाजीनगर, पांडवनगर, संभाजीनगर, वडारवाडी, गंजपेठ, सानेगुरुजी वसाहत, कसबा पेठ, राजेवाडी, घोरपडी पेठ, राजेंद्रनगर, एसआरए राजेवाडी आदी भागातही वसाहती आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)