प्रतिसाद : नयनतारा सहगल आणि साहित्यिकांची भूमिका

अशोक सुतार

यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच झाले. तेथे नयनतारा सहगल उद्‌घाटनाचे भाषण करणार होत्या. काही अपरिहार्य कारणांमुळे संमेलनास उपस्थित राहू नये, असे संमेलनाच्या आयोजकांकडून त्यांना कळवण्यात आल्यानंतर अनेक साहित्यिकांनी या प्रकाराचा निषेध केला. सहगल या परिवर्तनशील साहित्यिका आहेत. सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी भाषणात मांडलेल्या काही मुद्‌द्‌यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

नयनतारा सहगल यांचे वडील रणजीत पंडित हे महाराष्ट्रातील होत. त्यांनी “मुद्राराक्षस’, कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ आणि “राजतरंगिणी’ या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. ब्रिटिश अंमल असताना त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले होते. नयनतारा यांच्या आई विजयालक्ष्मी पंडित या पंडित नेहरूंच्या भगिनी होत. विजयालक्ष्मी पंडित यांना तीन वेळा तुरुंगवास घडला होता. नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनात का डावलले गेले, यावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. देशभक्तीचा वारसा असलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांनी सद्यपरिस्थितीवर केलेले परखड संमेलनाच्या आयोजकांना ते रुचले नसण्याची शक्‍यता आहे. झुंडशाहीच्या दबावाला बळी पडणे चुकीचे आहे, असे रोखठोक उद्‌गार 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुण ढेरे यांनी यवतमाळ येथील संमेलनात काढले आहेत. जे सामाजिक प्रतिबिंब दिसते, त्यावर स्पष्ट भूमिका घेणे साहित्यिकाचे कर्तव्य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यवस्थेला शरण न जाता त्याविरोधात यल्गार पुकारणे हा एकमेव धर्म साहित्यिकांचा किंवा सृजनशील व्यक्तीचा असला पाहिजे. सृजनशीलतेवर, त्याच्या निर्मितीवर दबाव येणे हे झुंडशाही व एकाधिकारशाही अस्तित्वात असल्याचे लक्षण असल्याचे म्हणता येईल. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांनी आपल्या भाषणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची मते व्यक्त केली आहेत. सकारात्मक दबावतंत्राचा वापर करून अभिव्यक्ती सुदृढ करणे, सर्व साहित्यिक व कलाकारांच्या हातात आहे. सध्याच्या स्थितीत नयनतारांनी व्यक्त केलेल्या भावनांवर विचार करणे इष्ट ठरेल.

सहगल यांनी साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या भाषणात देशातील धार्मिक-सांस्कृतिक विविधतेवर भाष्य केले आहे. त्या म्हणतात, विविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्‍यात आली आहेत. आज देशातील वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत. एकूण धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. देशातील आहार, वेशभूषा, सण, धर्म यांत विविधता आहे. आज धार्मिक विविधता निपटून टाकून एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे देशातील विविधता धोक्‍यात आली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. ते धर्मविरोधी नव्हते तर निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक छत्रछाया देऊ शकेल, असा विश्‍वास त्यांना होता. आज देशात जमावाच्या हिंसाचारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्रय यांना सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये कोणतेही स्थान नाही, असे सहगल यांचे मत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल त्या म्हणतात, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंताना अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि बंगळुरूमध्ये स्वतंत्र विचार आणि हिंदुत्वाला विरोध असल्यामुळे गौरी लंकेशला ठार मारण्यात आले. आणखी काहींना ठार मारण्याच्या धमक्‍या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे.

सध्या भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा उद्योग सुरु असल्याचे मत सहगल यांनी व्यक्त केले आहे. आपल्या मूलभूत हक्कांच्या पायमल्लीच्या विरोधात पदयात्रा आणि मेळावे घेतले जात आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षणक्षेत्रातले लोक, वकील, इतिहासकार आणि वैज्ञानिक, दलित आणि आदिवासी आणि शेतकरी प्रचंड निषेध करत आहेत. एकूण देशातील वातावरण मध्ययुगीन कालखंडाकडे चालल्याची खंत सहगल यांनी व्यक्त केलेली दिसत आहे.
साहित्यिकांनी अशा परिस्थितीमध्ये सद्यपरिस्थितीवर परखड भाष्य करणे गरजेचे आहे. लेखकांनी हस्तिदंती मनोऱ्यामध्ये न राहाता त्यांच्या लिखाणातून सुष्ट आणि दुष्ट, उचित आणि अनुचित यांच्या द्वंद्वामध्ये ते ठामपणे एक बाजू घेणे आवश्‍यक आहे.

कुठल्याही सृजनात्मक कलाप्रकाराप्रमाणेच लेखन हादेखील राजकीय कृतीशीलतेचा एक सशक्त प्रकार आहे. आणि ते विद्रोहाचे एक साधन आहे. म्हणूनच हुकूमशहा त्याला भीतात आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता पावले उचलतात. लेखकांनी बदललेल्या परिस्थितीचा निषेध करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना हुकूमशहांचे गुलाम बनून राहावे लागेल. निकोप लोकशाहीसाठी ही परिस्थिती घातक आहे. स्त्रियांना आपले जीवनानुभव शब्दांमध्ये कागदावर उतरवण्याकरता कितीतरी भयंकर अडथळे पार करावे लागतात. आपला पती, आपले कुटुंब आणि समाजाला दुखावण्याचा धोका त्यांना पत्करावा लागत असतो. आपला देश द्विधा अवस्थेत सापडला आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याकडून आपण स्वातंत्र्यापासून दूर चाललो आहोत का, हा विचार करणे महत्वाचे आहे.

एकूणच या सगळ्या प्रकारात मराठी लेखकांनी एक विशिष्ट भूमिका घेत, अशा सन्मान्य व्यक्तिच्या अवमानाविरोधात खंबीर भूमिका घेणे आवश्‍यक होते. पण ते तितकेसे झाले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)