उदयनराजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल

सौ. दमयंतीराजे भोसले यांची अपेक्षा

कराड – या लोकसभेच्या निवडणुकीतील सलग तिसऱ्यांदा संसदेत जाण्याचा बहुमान मोठ्या मताधिक्‍याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना मिळवून देण्यात मतदार संघातील स्त्रीशक्तीचा मोठा वाटा असावा अशी अपेक्षा सौ. दमयंतीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. कराडच्या पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तालुका कॉंग्रेस कमिटी व राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका समिती यांच्यावतीने झालेल्या महिला मेळाव्यात त्या उपस्थित महिलांशी संवाद साधत होत्या.

माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मतदारसंघाच्या विकासासाठी महाराजसाहेबांनी दिलेले योगदान बहुमोल आहे त्यांच्या मनात सतत जिल्ह्याच्या विकासाचाच विषय असतो. कोणत्याही बाबतीत विचार करताना सर्वप्रथम ते जनतेच्या सोईसुविधांनाच प्राधान्य देत असतात, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे जनता त्यांनाच विजयी करेल, असा विश्‍वास मला वाटतो असेही सौ. दमयंतीराजे भोसले यांनी यावेळी मत व्यक्‍त केले.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोक खा. उदयनराजेंच्याकडे येत असतात. गट- तट, मतदारसंघ, आपला-परका असा कोणताही भेद न ठेवता ते संबंधितांची कामे करण्यासाठी आपले वजन वापरतात. त्यामुळे असे क्रियाशील आणि विकासाभिमुख नेतृत्व पुन्हा एकदा संसदेत पाठवूया. आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, शिवछत्रपतींचे वारस आणि विकासाची तळमळ असणारे नेते म्हणून महाराजसाहेबांची ओळख आहे. या पूर्वीच्या निवडणूकीपेक्षाही प्रचंड मतांनी त्यांना निवडून देवूया आणि सर्वाधिक मताधिक्‍याचा विक्रम त्यांच्या नावावर घडवूया. यावेळी जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा धनश्री महाडिक, जयश्री पाटील, निताताई मोहिते, अर्चना पाटील, विद्याताई थोरवडे आदींसह तालुक्‍यातील महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)