सुधारित क्रीडा धोरण शासनाच्या दरबारात

पाच वर्षांनंतर पालिकेने केले धोरणात बदल

काय आहे सुधारित क्रीडा धोरणात

नव्या धोरणानुसार, महापालिकेच्या हद्दीत क्रीडा आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल, क्रीडांगणे विकसित करून, या क्रीडांगणांवरील सुविधा शहरातील खेळाडूंना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, लॉन टेनिस, जलतरण तलाव, रायफल शूटिंग केंद्र, बॉक्‍सिंग हॉल, कृत्रिम गिर्यारोहण भिंत, स्क्वॅश कोर्ट, बोट क्‍लब, मैदाने, स्केटिंग ग्राउंड, क्रीडा ग्रंथालये, तलवारबाजी केंद्र, धनुर्विद्याकेंद्र, वेटलिफ्टिंग सेंटर, हॉकीचे मैदान या खेळ प्रकारांचा समावेश आहे. कै. बाबूराव सणस मैदान येथे स्वतंत्र क्रीडा माहिती विषयक कक्ष तयार करून नागरिकांना क्रीडाविषयक माहिती सहज उपलब्ध करून देण्याचेही या धोरणात प्रस्तावित आहे.

पुणे – महापालिकेने 2013 मध्ये तयार केलेल्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या धोरणास मागील महिन्यात मुख्यसभेत मान्यता मिळाल्यानंतर ते आता राज्यशासनाच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या 98 हजार 989 विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे धोरण तयार करण्यात आले असले, तरी शहरातील सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध घटकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील क्रीडागंणासाठी आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल-क्रीडांगणे विकसित करणे, क्रीडा स्पर्धा भरवणे, क्रीडा नर्सरी तयार करणे, स्वतंत्र क्रीडा माहिती विषयक कक्ष, उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे, आदी योजनांचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने राज्यशासनाच्या धर्तीवर 2013 मध्ये पहिल्यांदा क्रीडा धोरण तयार केले होते. अशा प्रकारे क्रीडा धोरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली होती. मात्र, यात अनेक त्रुटी असल्याने त्यात वारंवार सुधारणा करण्यात येत होत्या. मात्र मागील वर्षी, खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडा संघटनांच्या सूचनांचा समावेश करून महापालिकेने सुधारित क्रीडा धोरण 2018 तयार केले होते. महापालिकेची क्रीडा समिती, त्यानंतर स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मान्यतेनंतर हे धोरण राज्यशासनाच्या क्रीडा विभागाकडे मान्यतेसाठी दोन आठवड्यांपूर्वी पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)