हर्षल भामरे, पद्मश्री दाईंगडे राज्यात प्रथम
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. महिलांमध्ये कोल्हापुरातील पद्मश्री दाईंगडे या प्रथम आल्या आहेत.
लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण 428 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठीच्या 392, तर इंग्रजीच्या 36 पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पात्र उमेदवारांची शिफारस मूळ कागदपत्रांच्या तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. तसेच, अपंगांसाठी राखीव असलेल्या पात्र उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अटीवर शिफारस करण्यात आली आहे. तसेच, अर्जात प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा दावा केलेल्या उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी संबंधित विभागीय क्रीडा उपसंचाकांचा क्रीडा प्रमाणपत्र शासनाकडे सादर करणे अनिवार्य राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
या परीक्षेच्या निकालानंतर ज्या उमेदवारांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. सर्व निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यात निवड झालेल्या उमेदवारांची यादींचा समावेश आहे.