विश्रांतीगृहालाच दिली “विश्रांती’

-सुविधांचा अभाव ः महिला विश्रांतीगृहात आजपर्यंत एकाही महिला वाहकाने केला नाही मुक्काम
-वल्लभनगर एस.टी आगारात महिला वाहकांचे हाल

पिंपरी – वल्लभनगर येथे असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस.टी) आगारात मुकामी येणाऱ्या महिला वाहकांचे हाल होत आहेत. आगारात तीन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात पुरुष चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाचे नूतनीकरण व महिला वाहकांसाठी विश्रांतीगृहाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, आवश्‍यक असलेल्या सोयी-सुविधे अभावी आगारात येणाऱ्या महिला वाहकांना मुक्काम करता येत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी प्रशासन मात्र विश्रांतीगृहाची निर्मिती करुनही महिला कर्मचाऱ्यांना मुक्‍कामासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगत आहे.

तीन महिन्यांपूर्वी परिवहन महामंडळाच्या व रोटरी क्‍लबच्या संयुक्‍त विद्यमाने आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाचे नूतनीकरण व महिला विश्रांतीगृहाची निर्मिती करण्यात आली होती. या विश्रांतीगृहाचे उद्‌घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, काही दिवसातच पुरुष व महिला दोन्ही विश्रांतीगृहांना अनेक समस्येने ग्रासले आहे. वल्लाभनगर आगारात 22 महिला वाहक कार्यरत आहेत. त्यांना आगार प्रशासनाकडून दिवसपाळीच दिली जाते. मात्र, राज्यभरातून वल्लभनगर येथे मुक्कामी येणाऱ्या बसेसची संख्या मोठी असल्याने येथे सुमारे रोज 7 ते 8 महिला वाहक मुक्कामी येतात. मात्र, त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विश्रांतीगृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने व अन्य अनेक समस्या असल्याने त्यांना येथे मुक्कामी थांबता येत नाही. यामुळे त्यांना पदरमोड करुन खासगी लॉजवर किंवा नातलगांच्या घरी मुक्कामी जावे लागत आहे.

मग बनवले कशासाठी ?
आगाराच्या पहिल्या मजल्यावर महिला विश्रांतीगृहाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी दुमजली पाच खाटांची सोय करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकाकडून 20 गाद्यांची सोय देखील करण्यात आली आहे. मात्र, विश्रांतीगृहात पाणीच पोहचत नसल्याने महिला कर्मचाऱ्यांना येथे मुक्कामी रहाता येत नाही. याबाबत वल्लभनगर आगार प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तर, महामंडळाच्या स्थापत्य विभागाला सुद्धा याबाबत कळविले आहे. मात्र, यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्याने विश्रांतीगृह असून अडचन नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. परंतु सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत की महिलांचे विश्रांतीगृह महिला वाहकांना मुक्‍कामासाठी दिलेले नाही. महिला कर्मचाऱ्यांना मुक्‍कामासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे की जर परवानगी द्यायचीच नव्हती तर बनवले कशासाठी?

आगारातील महिलांचे विश्रांतीगृह हे महिला वाहकांना मुक्कामासाठी दिलेलेच नाही. याचा वापर फक्‍त चेंजिंग रुम प्रमाणे करण्यात येतो. विश्रांतीगृहाला रोटरी क्‍लब कडून खाटा पुरवल्या आहे. मात्र, महिला कर्मचाऱ्यांना मुक्कामासाठी परवानगी दिलेली नाही. पाणी पुरवठ्याबाबत आगाराची व्यवस्था बघणाऱ्या ब्रिस्क कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे.

– संजय भोसले, आगार प्रमुख, वल्लभनगर आगार प्रमुख

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)