मुंबई – रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी विविध मूल्यांची नाणी बाजारात सादर करीत असते. मात्र जुनी नाणी रद्द होणार किंवा इतर अफवांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. कुठल्याही नाण्यावर कसल्याही मर्यादा आणण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा कसलाही विचार नसून ही सर्व नाणी बॅंकांनी आणि इतर संस्थांनी स्वीकारावी असा आग्रह रिझर्व्ह बॅंकेने एका परिपत्रकाद्वारे केला आहे.
50 पैसे, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये या मूल्यांची नाणी वेळोवेळी सादर केलेली आहेत. ती नाणी चलनात आहेत असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. सर्व बॅंकांनी ही नाणी स्वीकरावी त्याचबरोबर ती वितरित करावी, अशा स्पष्ट सूचना रिझर्व्ह बॅंकेने जारी केल्या आहेत. या संदर्भात कोणीही कसल्याही अफवा पसरविल्या तरी ग्राहकांनी आणि संबंधितांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.