शिंदे साहेब जरा इकडे लक्ष द्या
नावीन्यपूर्ण कल्पना राबविणे आणि प्रशासकीय शिस्तीत राबवण्याचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांचा हातखंडा आहे. मग असे असताना प्रतापसिंह हायस्कूलच्या नूतनीकरणाचे काम इतक्या संथ गतीने होत असताना ठेकेदाराला विचारणा होत नाही याविषयी मात्र विलक्षण आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे शिंदे साहेब तुम्ही लक्ष द्या, असे सांगण्याची वेळ आली आहे.
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचे ऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जुन्या दगडी इमारतीची कौले काढण्यात आल्याने त्या वास्तूची देखभाल दुरुस्तीचा विषय गांभीर्याने हाताळले जात नसल्याची तक्रार आहे. जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर प्रशासकीय देखरेख नसल्याने काम मुदतीत होईल की नाही या विषयी शंका निर्माण झाली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण घेतल्याने साताऱ्याचे प्रतापसिंह हायस्कूल देशभर नावाजले जाते. शाळेच्या रेकॉर्डला नोंद असलेले दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत. मात्र या शाळेला जेवढा ऐतिहासिक वारसा आहे तो त्या गांभीर्याने जपला जात नाही ही सातारकरांची खरी खंत आहे. भवानी पेठेतील या शाळेच्या दगडी इमारतीकरिता सातारा जिल्हा परिषदेने बावीस लाख रुपये निधी मंजूर केला. मात्र ज्या गतीने आणि गांभीर्याने दुरुस्तीचे काम व्हायला पाहिजे ते न झाल्याने निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दगडी इमारतीची कौले काढण्यात आल्याने आकाशाच्या दिशेने वास्तू मोकळीच आहे.
अशावेळी वळीवाचा हंगाम तोंडावर असताना वादळी पाऊस झाल्यास इमारतीच्या लाकडी बांधकामाला धक्का लागणार आहे. इमारतीला बऱ्याच मोठ्या खिडक्या असून गजांअभावी त्या धोकादायक बनल्या आहेत. अचानक वरच्या मजल्यावरून कोणी डोकावल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कुजलेले वासे, रंग उडालेल्या भिंती, तळीरामांच्या अड्ड्यामुळे रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्रताप सिंह भाजी मंडईच्या पिछाडीने शाळेत होणाऱ्या भुरटया चोऱ्यांनी शाळेची रया गेली आहे. ठेकेदाराकडून त्याच्या उपठेकेदाराकडून काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याने 15 जूनच्या शैक्षणिक वर्षात तरी इमारत उपलब्ध होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विहित मुदतीत शाळेच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करून घेण्यास शिक्षण विभाग बांधील आहे. शाळेच्या सुविधांची यादी व कामाचा आढावा ठेकेदाराकडून मागवण्यात येत आहे.
पुनीता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी