“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द

प्रक्षेपणाच्या 56 मिनिटे आगोदर घोषणा

तांत्रिक दोषामुळे खबरदारीचा उपाय

हे अपयश नाही-“इस्रो’चा खुलासा

श्रीहरीकोटा – भारताची महत्वाकांक्षी “चांद्रयान 2′ ही चंद्रावरील दुसरी मोहिम तांत्रिक कारणामुळे प्रक्षेपणाच्या अगदी तासभर आगोदरच रद्द करावी लागली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ने ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हे प्रक्षेपण होणार होते. प्रक्षेपण ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे अंतराळ जिज्ञासूंची निराशा जरी झाली असली, तरी हे अपयश मानले जाऊ नये, असे “इस्रो’ने म्हटले आहे.

“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण आज पहाटेच्या सुमारास 2 वाजून 62 मिनिटांनी होणार होते. मात्र या नियोजित प्रक्षेपण कालावधीच्या 56 मिनिटे आगोदरच “इस्रो’च्या मिशन कंट्रोल सेंटर कडून याबाबतची घोषणा करण्यात आली. मात्र ऐनवेळेस झालेल्या या घोषणेमुळे काही मिनिटे संदिग्धतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण थोड्याचवेळात “इस्रो’च्या अधिकृत स्पष्टिकरणामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली. “चांद्रयान 2′ घेऊन अवकाशात जाणाऱ्य लॉंच व्हेईकल सिस्टीममध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहिम रद्द करण्यात आली, असे “इस्रो’चे सहसंचालक (जनसंपर्क) बी. आर. गुरुप्रसाद यांनी सांगितले.

अर्थात ही मोहिम तुर्तास स्थगित ठेवण्यात आली असून या मोहिमेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. “इस्रो’ने “चांद्रयान 2′ मोहिम यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्‍चित केली होती. नंतर ही 15 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

“चांद्रयान 2′ हे सतिश धवन अंतराळ केंद्रातून “जीएसएलव्ही एमके 3′ रॉकेटवरून अवकाशात सोडण्याचे नियोजन आहे. तीन प्रमुख भागांचा संच असलेल्या या अंतराळ यानाचे एकूण वजन 3,850 किलो आहे. या यानामध्ये ऑर्बिटर, लॅन्डर आणि रोव्हरचा समावेश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे उतरणार होते. 11 वर्षांपूर्वी “चांद्रयान 1′ ने चंद्राभोवती 3,400 फेऱ्या केल्या आणि 29 ऑगस्ट 2009 पर्यंत 312 दिवस ते कार्यरत राहिले होते. एकूण 978 कोटी रुपये खर्चाच्या “चांद्रयान 2’ला घेऊन जाणाऱ्या “जीएसएलव्ही-एमके-3′ या लॉंच व्हेईकलला “बाहुबली’ म्हणतात. या यानातून चंद्रावर उतरण्यासाठी 54 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

प्रक्षेपणाच्या पूर्वतयारीची सर्व उजळणी गेल्याच आठवड्यात घेण्यात आली होती. रविवारी सकाळी 6.51 वाजता काऊंटडाऊनही सुरू झाले. शास्त्रज्ञांकडून विविध चाचण्या घेतल्या जात होत्या. मात्र अगदी ऐनवेळी लक्षात आलेल्या तांत्रिक अडचणीला तासाभरात सोडवणे अवघड होते. त्यापेक्षा खबरदारीचा उपाय म्हणून मोहिम रद्द करण्यात आली.

जिज्ञासूंचा हिरमोड                                                                                                        देशासाठी अत्यंत महत्वाची मानली गेलेली ही मोहिम नियोजनानुसार पार पडली असती, तर चंद्रावर यान उतरवणाऱ्या रशिया, अमेरिका आणि चीनबरोबर भारताची गणना झाली असती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर जिज्ञासूंनी गर्दी केली होती. काही जणंनी दुचाकीवरून प्रवास करून किनाऱ्यावरच रात्र काढली होती. “इस्रो’ने प्रेक्षकांसाठी एक विशेष गॅलरीही उभारली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)