नोकर भरती प्रक्रियेचा अडथळा दूर

दीड हजार रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण; आचारसंहितेपूर्वी जाहिराती होणार प्रसिद्ध

पुणे – राज्य शासनाकडून विविध शासकीय कार्यालयांतील नोकर भरतीची घोषणा करण्यात आली. या नोकर भरतीसाठी पुणे विभागाच्या मागासवर्गीय कक्षाने दीड महिन्यात 1 हजार 500 बिंदूनामावलींच्या (रोस्टर) फाईल्सची तपासणी पूर्ण केली आहे. कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी कसून तपासणीला अधिकाऱ्यांकडून प्राधान्य देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात मागासवर्गीय कक्ष कार्यान्वित असून यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांमधील सर्वच शासकीय कार्यालयांच्या रोस्टर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. कार्यालयातील विविध आरक्षणनिहाय एकूण मंजूर पदे, रिक्‍त पदे यांचे रोस्टर तयार करावे लागत असून प्राथमिक स्तरावर त्याची तपासणी करून अंतिम तपासणीसाठी ते मागागवर्गीय कक्षाकडे सादर करावे लागते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कार्यालयांना “एनओसी’ मिळवून जाहिराती प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविता येणे शक्‍य होते.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या कार्यालयांना भरती प्रक्रियेसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. गेल्या दीड महिन्यात मागासवर्गीय कक्षात रोस्टर तपासणीसाठी शासकीय कार्यालयांतील लिपिकांची, कार्यालय प्रमुखांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळाले आहे. शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी (एसईबीसी) 16 टक्‍के आरक्षण लागू करण्यात आले. त्यानंतर नुकतेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्‍के आरक्षण लागू करण्यात आले. नवीन आरक्षण लागू करण्यामुळे शासनाने सुधारित बिंदूनामावली तयार करून ती मागासवर्गीय कक्षाकडून पुन्हा तपासणीचे आदेश लागू केले. यामुळे कार्यालयांना पुन्हा रोस्टर तयार करून त्याची तपासणी करून घेण्यासाठी धावाधाव करावी लागली.

एकेका कार्यालयांचे 3 वेळा रोस्टर तपासून देण्याची प्रक्रिया करावी लागण्याने मागासवर्गीय कक्षाची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, या कार्यालयाचे सहायक आयुक्‍त मुकेश काकडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र कार्यालय सुरू ठेवून रोस्टर तपासणीचे काम मार्गी लावले आहे. पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीच्या 110 रोस्टरची अंतिम तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. तपासून झालेले रोस्टर शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत. महापालिका, नगरपालिका, खासगी शिक्षण संस्थेची प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या 450 रोस्टरची तपासणी करण्यात आली आहे. एकूण 18 वरिष्ठ महाविद्यालयांच्या रोस्टरची आधी तपासणी झाली असली तरी आणखी एकदा त्यांची तपासणी सुरू होणार आहे. शिक्षण विभाग वगळता इतर विविध शासकीय कार्यालयांच्या रोस्टरची आता अंतिम तपासणी सुरू आहे. हे कामही लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

तपासणी करून ठेवलेली रोस्टर घेऊन जाण्यासाठी काही कार्यालयांना विसरही पडला आहे. मागासवर्गीय कक्षाकडून संबंधित कार्यालयांना तपासणीचे रोस्टर घेऊन जाण्याच्या वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रोस्टरची प्रलंबित प्रकरणे लावली मार्गी
पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडे दाखल झालेल्या बहुसंख्य शासकीय कार्यालयांच्या रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. आता फारशी प्रलंबित प्रकरणे राहिली नाहीत. काही रोस्टर तपासणी करताना अडचणी जाणवल्याने त्याबाबत शासनाकडून सूचना मागवून त्यांची तपासणी मार्गी लावण्यात आलेली आहे. सर्वच रोस्टरची बारकाईने तपासणी करण्यात आलेली आहे. काही रोस्टरमध्ये खूप चुका झालेल्या होत्या. त्या चुकांची दुरुस्तीही करण्यात आलेली आहे. दररोज किमान 70 रोस्टरची तपासणी करण्याचा धडाका लावल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती मागासवर्गीय कक्षाचे सहायक आयुक्‍त मुकेश काकडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)