प्रचारतोफा आज थंडावणार सभा, शक्‍तिप्रदर्शनावर उमेदवारांचा भर

गाठीभेटीवर राहणार जोर

29 एप्रिल रोजी मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाण्याची शक्‍यता आहे. एकंदर निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा शनिवारी संपणार असून, उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे तर दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना अधिक सजग करण्यात आले आहे

पथकांची वाढली जबाबदारी

जाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवली जाणार असून जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

वाहनांची परवानगीही संपणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या 48 तासापूर्वी प्रचार बंद करायचा आहे. त्यामुळे, अधिकृत प्रचार शनिवारी 6 वाजेपासून बंद होईल. त्यानंतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी असलेल्या वाहनांची परवानगी संपणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या सभा, बैठका आणि स्पिकरद्वारे होणारा प्रचार बंद असणार आहे.

 

पिंपरी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथा आणि शेवटच्या टप्प्यात धडाक्‍यात सुरू असलेल्या प्रचारतोफा आज शनिवार दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या 48 तासांपूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. त्यामुळे, शनिवारी मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदारासंघासाठी प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतर उमेदवारांना गृहभेटी मात्र करता येतील.

मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी 13 एप्रिलपासून जाहीर प्रचाराला सुरुवात झाली होती. ध्वनिक्षेपक, कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा असे प्रचाराचे स्वरुप राहिले. 16 दिवस उमेदवारांनी दिवसरात्र एक करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. अनेक भागात प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत. या मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन केले होते. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या त्याच प्रमाणे कॉर्नर बैठकांतून विकास कामावंर चर्चा झडल्या त्यामुळे या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पिंपरी-चिंचवड शहराचा सहभाग असलेल्या या दोन्ही मतदार संघात शनिवारपासून प्रचार थांबेल. शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा जोर शहरात रॅली काढून प्रचारावर राहणार आहे. सायंकाळी सहा वाजता प्रचार संपणार असल्याने, जाहीर सभा दुपारीच आटोपण्यावर पक्ष व उमेदवारांचा भर आहे.

त्यानंतर शेवटच्या दिवशी शहरी भागात शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होत असल्याने राज्यभरातील दिग्गज मंडळी या मतदारसंघात तळ ठोकून आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याबरोबरच आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपचे नेतेही पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचारसभेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उठणार आहेत.

सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. मावळ मतदारसंघासाठी एकूण 2 हजार 504 मतदान केंद्र आहेत. यात पिंपरी शहरात 399 तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 470 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी मावळमध्ये एकूण 14 हजार 488 कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी तैनात आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होणारी बूथ कमेटी तयार झाली असून, त्यांचे पुन्हा प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. रविवारी या सदस्यांना मतदानाचे साहित्य वितरित केले जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)