पुणे – शहर आणि धरणांच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. शहरात मंगळवारी दिवसभर ऊन आणि हलक्या स्वरुपाच्या सरी असे चित्र होते. मात्र, सायंकाळी आठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पुढील सहा दिवस शहर आणि आजूबाजूच्या परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मागील 24 तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात पावसाचा जोर कमी होता. शहरात मागील 24 तासांत 29 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद आहे. लोहगाव येथे 16 मिमी तर पाषाण येथे 35 मिमी इतका पाऊस झाला.
मागील 24 तासांत जिल्ह्यात एकूण 538 मिमी पाऊस झाला. यामध्ये हवेली तालुक्यात 19.36 मिमी, मुळशी 105 मिमी, भोर 75 मिमी, मावळ 92 मिमी, वेल्हा 141 मिमी, जुन्नर 12 मिमी, खेड 24 मिमी, आंबेगाव 12.50 मिमी, शिरुर 4 मिमी, बारामती 5.75 मिमी, इंदापूर 5.15 मिमी, दौंड 7.88 मिमी आणि पुरंदर 32.71 मिमी पावसाची नोंद आहे.