द्रमुक नेत्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा 

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला कारवाईला विरोध

चेन्नई – तामीळनाडूमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकचे ज्येष्ठ नेते दुराईमुरूगन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने शनिवारी छापा टाकला. त्या कारवाईला द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने मोठेच नाट्य घडले. छापा टाकण्यासाठी पोहचलेल्या प्राप्तिकर विभागाच्या पथकाला द्रमुक कार्यकर्त्यांनी रोखले. दुराईमुरूगन यांच्या घराची तपासणी करण्यासाठी आवश्‍यक परवानगी नसल्याचा आक्षेप कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर सर्च वॉरंटसह प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्याने पुढील कारवाई करण्यात आली.

छाप्यावेळी 10 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने छाप्यासाठी निवडलेल्या वेळेबद्दल दुराईमुरूगन यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मुलाला द्रमुकने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. दरम्यान, तामीळनाडूचे शेजारचे राज्य असणाऱ्या कर्नाटकातील सत्तारूढ जेडीएसच्या नेत्यांच्या ठिकाणांवर नुकतेच प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्यामुळे संतप्त झालेल्या जेडीएसने मित्रपक्ष कॉंग्रेससह प्राप्तिकर विभागाच्या विरोधात निदर्शने केली. त्या निदर्शनांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी हेही सहभागी झाले होते. आता तामीळनाडूतील कारवाईबद्दल द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनीही मोदी सरकारवर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)