घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्‍न सुटला नाही

संग्रहित छायाचित्र

आढळराव पाटलांचे कोल्हेंवर टीकास्त्र: बांदल, मोहिते गुन्हेगारी प्रवृत्तीचे

हे कुठले राजकारण…

राष्ट्रवादीचे बांदल यांनी जमीन व्यवहारात जे कृत्ये केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. चुका तुम्ही करायच्या, दंगली तुम्ही करायचे, लोकांना तुम्ही पाठवायंच आणि गुन्हे दाखल झाले तर आढळराव-पाटील यांचे नाव घेता. हे कुठले राजकारण आहे, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला. तुमच्याकडे आलेला इतका पैसा व तुमचा रुबाब कुठून आला, ही कृत्ये करून हा रुबाब व पैसा तुमच्याकडे आला आहे, असे टीकास्त्र त्यांनी माजी आमदार दिलीप मोहिते व मंगलदास बांदल यांच्यावर सोडले.

शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आजही माझ्याकडे त्यांचे प्रश्‍न व अडचणी सोडवण्यासाठी येतात. तुमचा खासदार पंधरा दिवसांमध्ये बैलगाडी शर्यतीचा प्रश्‍न सोडवून घोडीवर बसून येणार होता. आता त्याचे काय झाले, असे टीकास्त्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोडले.

दरम्यान, पिंपरी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज शिरूर येथील पत्रकार परिषदेत आढळराव पाटलांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

आढळराव पाटील म्हणाले की, तुमच्या मुलाचा पराभव झाल्याने चेहरा तुमचाच काळवंडला आहे. हे लक्षात ठेवा. माझ्या शिवसेनेचे राज्यात 18 खासदार आहेत. तुमच्या पक्षाचे फक्‍त चार खासदार आहे. माझा शिवसेनेने योग्य सन्मान केला आहे. राजगुरुनगरचे माजी आमदार व जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले की, दोघा नेत्यांची पार्श्‍वभूमी गुंडगिरीची आहे. त्यांचा इतिहास तपासला तर मारामाऱ्या, दंगली, खंडणी गोळा करणे, जमिनीच्या व्यवहारातून फसवणूक हे उद्योग आहेत. याच माध्यमातून दोनशे ते पाचशे कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल बोलणे उचित नाही. राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आढळराव पाटील म्हणाले की, मी राजकारणात स्वत:च्या हिंमतीवर आलो. माझे चुलते मुख्यमंत्री किंवा केंद्रीय कृषिमंत्री नव्हते. हे अजित पवार यांनी लक्षात घ्यावे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, तालुका प्रमुख पोपट शेलार, गणेश जामदार, शहरप्रमुख संजय देशमुख, मयूर थोरात, राजेंद्र शिंदे, सुनील जाधव, बलराज मल्लाव, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)