टॅंकरमधून वितरित होणाऱ्या पाण्याची शुद्धता रामभरोसेच

पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्‍नचिन्ह कायम; पाणी तपासणी करण्याची होतेय मागणी
ओंकार दळवी

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील 33 गावांना 36 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही जामखेड नगरपरिषदेने टॅंकर सुरू केले आहेत. नागरिक टॅंकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची तमा न बाळगता आपली तहान भागवत आहे. पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या पाण्याची शुद्धता सध्या तरी, रामभरोसेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कदाचित एखादवेळी या पाण्याने गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यंदा दुष्काळाची दाहकता तीव्र असल्याने, अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. उन्हाच्या चटक्‍याबरोबरच तहानलेल्या ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी उन्हाचे चटके खात, मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणणे भाग पडत आहे.

तालुक्‍यातील बऱ्याच गावातील अधिग्रहीत विहिरीतील पाण्याने तळ गाठले आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली जात आहे. अनेक हातपंप कोरडेठाक पडले आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आजमितीस 33 गावातील नागरिकांची तहान भागवण्याचे काम टॅंकर करीत आहेत. मात्र गावात टॅंकरच्या माध्यमातून पुरवण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य आहे, की नाही याबाबत शंकाच आहे. पाणी शुद्ध करताना त्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते. शिवाय तुरटीही फिरवतात. त्यानंतर पाण्याची शुद्धता तपासून हे पाणी पिण्यायोग्य आहे की अयोग्य हे ठरवले जाते. मात्र टॅंकरमधील पाण्यावर अशी कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.

थेट टॅंकरमध्ये भरलेले पाणी नागरिकांना दिल्या जात असल्याने, टॅंकरच्या पाण्याची शुद्धता ही रामभरोसेच आहे. सध्या बहुतांश टॅंकरसाठी कूपनलीकेचे पाणी देण्यात येत आहे. हे पाणी स्वच्छ असले तरी, त्याची तपासणी करणे आवश्‍यक आहे. मात्र अपेक्षित पाणी नमुने दिले जात नाहीत. त्यामुळे टॅंकरच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत निश्‍चित सांगणे कठीण आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे. गावाचे प्रथम नागरिक म्हणून ओळख असलेले, सरपंच व सदस्य यांचेही या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी तरी या पाण्याच्या शुध्दतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)