विसापूरची पोल्ट्री बंद करण्याचा प्रांतांचा निकाल रद्द

वडूज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

वडूज – विसापूर, ता. खटाव येथील घुमट माळावरील वादग्रस्त पोल्ट्री फार्म बंद करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय वडूज येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. याबाबतची खटल्याची माहिती अशी की, विसापूर येथील विलास जाधव यांनी गावापासून 1 किमी दूर असलेल्या त्यांच्या जमिनीत कुक्कूटपालन व्यवसाय सुरू केला होता. याकरिता त्यांनी ग्रामपंचायतीकडून योग्य ती परवानगी घेण्यात आली होती. हा पोल्ट्री फार्म त्यांनी 10 लाख रूपये कर्ज काढून उभा केला होता.

या पोल्ट्री फार्ममुळे दुर्गंधीचा त्रास होतो. या कारणावरून गावातील मारूती खंडू साळुंखे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्म बंद करावा अगर पर्यायी जागेत स्थलांतरीत करावा असा आदेश दिला होता. या आदेशास पोल्ट्री मालक जाधव यांनी वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. खटल्याची सुनावणी न्या. आर. के. मलाबादे यांच्या कोर्टासमोर झाली. सुनावणीत पोल्ट्री फार्म रद्द करण्याच्या प्रांताच्या निकालामध्ये अनेक कायदेशीर त्रुटी आढळल्या. त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याबरोबर वडूज येथील ऍड. प्रशांत पाटील यांनी जाधव यांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. ऍड. पाटील यांना ऍड. सौ. शीतल पाटील यांचे सहकार्य लाभले.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्या. मलाबादे यांनी प्रांतांचा निर्णय रद्द केला. गावातील राजकीय विरोधकांनी तक्रारदार मारूती साळुंखे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निवाड्याने आपल्यासारख्या कर्ज काढून व्यवसाय करणाऱ्या असंख्य पोल्ट्री धारकांना दिलासा मिळाला असून नसत्या उचापती करणाऱ्यांना चपराक बसली असल्याचे मत विलास जाधव यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)