पोलिसांनी जळगाव परिसरातून केली अपहृताची सुटका
अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या खात्यात भरले अडीच लाख
पिंपरी – सहा जणांच्या टोळीने व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरी येथे घडला. ही घटना सोमवार (दि.13) रात्री सव्वा अकराच्या सुमारास पिंपरीतील सागर हॉटेल, विशाल ई स्क्वेअर थिएटरजवळ सागर हॉटेल या परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी व्यवसायिकांची सुटका केली आहे. यज्ञेश विनोद तिलवा (वय, 33 रा. भिगवनकर प्लाझा, फ्लॅट क्र.203 शिंदेवस्ती, रावेत) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किशोर सावंत, दिलीप अवसरमल आणि त्याचे 3 ते 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
तिलवा यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार यज्ञेश व्यावसायिक आहेत. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आरोपी किशोर सावंत, दिलीप अवसरमल आणि त्याचे 3 ते 4 साथीदारांनी मिळून टोयोटा इटॉस कार (क्र.एमएच 12, एनबी-0749) मधून यज्ञेश यांचे दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. या प्रकरणी फिर्यादी यांच्या पतीचे मित्र सचिन जैद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आरोपींनी सांगितलेल्या कॅनरा बॅंकेच्या खात्यात अडीच लाख रुपये भरले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिलवा यांचा मार्केटिंगचा व्यवसाय असून आरोपींसोबत त्यांचे पैशांवरून वाद सुरू होते. काही रक्कम तिलवा यांनी आरोपींना दिली होती. आरोपींनी सोमवारी रात्री तिलवा यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या पत्नीकडे दहा लाख रुपये खंडणी मागितली. पिंपरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी जळगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.
हवी असलेली माहिती मिळताच पोलिसांच्या एका पथकाने जळगावमधून तिलवा यांची सुटका करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री पोलीस आरोपींसह पिंपरीत दाखल होणार असून अपहरणाचे नेमके कारण तसेच अधिक माहिती प्राप्त होऊ शकेल. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करत आहेत.