रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना घरपट्टी व पाणीपट्टीत सूट 

राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत

रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील अनेक नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांनी घरपट्टी, पाणीपट्टीमध्ये 10 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलेले आहेत. परंतु गावपातळीवर अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतलेला नाही. असा निर्णय घेणारी भेंडा बुद्रुक ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.

भेंडा – घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी साठवून उपयोगात आणणे किंवा जमिनीत जिरवून जलपुनर्भरण करणाऱ्या व्यक्तींना घरपट्टी व पाणी पट्टीमध्ये 10 टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे सरपंच सखुबाई गोंडे यांनी यावेळी सांगितले. नेवासा तालुक्‍यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा जलमित्र सुखदेव फुलारी यांचे प्रमुख उपस्थितीत व माजी सरपंच अशोकराव मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.

ग्रामपंचयतीने गावातील सर्व नळांना तोट्या बसवाव्यात, घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये किमान पाच वर्षासाठी 10 टक्के सूट द्यावी अशी सूचना जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केली. या सूचनेला अशोकराव मिसाळ, अंबादास गोंडे यांनी अनुमोदन दिले. सर्व उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर केला.
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, सरपंच सखुबाई गोंडे, बलभीम गव्हाणे, कचरू यादव,
ग्रामपंचायत सदस्य मायकल गोर्डे, अशोक वायकर,अंबादास गोंडे, बाळासाहेब वाघडकर, दादासाहेब गजरे, देवेंद्र काळे, कादर सय्यद, संजय मिसाळ, भगवान गालफाडे, रोहिदास आढागळे, आरोग्य विभागाचे डॉ. मलदोडे, आरोग्यसेविका खंडागळे, अंगणवाडी सेविका कुसुम फुलारी, भारत भालेराव,राहुल कोळसे, दत्तात्रय गव्हाणे, अशोक साळवे, ग्रामसेवक रेवणनाथ भिसे, विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख, रासिंकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रारंभी बाबासाहेब गोर्डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती उपक्रमांची अंमलबजावणी करणेबाबद सरपंचाना पाठविलेले पत्र ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आले. अशोकराव मिसाळ, अंबादास गोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)