पुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला

दहा वर्षांत 19.23 टक्‍केवरून 39.35 टक्‍क्‍यावर आलेख गेला


नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणार : डॉ. के. व्यंकटेशम

पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा (गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण) टक्‍का मागील दहा वर्षांत वाढला आहे. 2012 मध्ये गुन्हे शाबीतीचे प्रमाण 19.23 टक्‍के होते, ते 2018 मध्ये 39.35 टक्‍के झाले आहे. मात्र, हे प्रमाण 2014 आणि 2017 मध्ये घटले होते, अशी माहिती पुणे पोलिसांच्या वार्षिक गुन्हे आढावा पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढावी यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत असल्याचे सांगत यासाठी जीपीएस, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे नमूद केले.

यावेळी सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित होते. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्यांचे विश्‍लेषण लक्षात घेता खुनाचा प्रयत्न, नवविवाहिता आत्महत्या, सदोष मनुष्यवध, दरोड्याची तयारी, बलात्कार, अंमली पदार्थ, जुगार हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 100 टक्‍के आहे. तर खून, विनयभंग आणि दुखापतीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 99 टक्‍केआहे. तर, गुन्हा सर्वाधिक कमी उघडकीस येण्याचे प्रमाण वाहन चोरी (दुचाकी, तीनचाकी, चारचाकी) याचे 29 टक्‍के इतकेच आहे. तर चेन चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दखल घेण्याजोगी वाढ झाली आहे. चेन चोरीचे (सोनसाखळी) गुन्हे 2017 मध्ये 78 होते, ते 2018 मध्ये 105 तर जबरी चोरीचे गुन्हे 295 वरून 336 इतके वाढले आहेत.

गंभीर गुन्हे आणि कंसात गुन्हे उघडकीची आकडेवारी
शहरातील गंभीर गुन्ह्यांचा विचार करता 2018 मध्ये खून 72 (71), खुनाचा प्रयत्न 128 (128), सदोष मनुष्यवध 5 (5), हयगयीने मृत्यू 267 (215), नवविवाहिता 19 (19), दरोडा 27 (26), दरोड्याची तयारी 17 (17), जबरी चोरी 336 (227), चेन चोरी 105 (76), इतर जबरी चोरी 231 (201), दिवसा घरफोडी 136 (61), रात्री घरफोडी 464 (211), सर्व प्रकारची चोरी 3,544 (1,177), सायकल चोरी 47 (15),वाहनचोरी 1,966 (576), वाहन पार्ट चोरी 9 (3), पॉकेट चोरी 16 (6), विश्‍वासघात 81 (71), फसवणूक 695 (580), दंगा 232 (228), दुखापत 947 (935), बलात्कार 236 (235), विनयभंग 516 (509), अंमली पदार्थ 76 (76), जुगार 317 (317)

तडीपार पुन्हा हद्दीत; पोलिसांचे अपयश
पुणे पोलिसांनी मागील दोन वर्षांत 273 गुडांवर तडीपारीची कारवाई केली होती. यातील तब्बल 200 गुन्हेगार पुन्हा शहराच्या हद्दीत आढळले. यामुळे तडीपारीच्या कारवाईनंतर संबंधित गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास पोलीस कमी पडत असल्याचे दिसत आहे. काही तडीपार गुडांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग करत गुन्हे ही केले आहेत.

शहरात व्हिआयपी व्यक्तींच्या दौऱ्यात वाढ
व्हीआयपी व्यक्तींचा दौरा असला की पोलीस यंत्रणेला त्यांच्या सुरक्षेच्या बंदोबस्तात गुंतून पडावे लागते. दैनंदिन कायदा सुव्यवस्थेचे काम सोडून तसेच हातातील तपास सोडून बंदोबस्ताचे काम करावे लागते. शहरात मागील दोन वर्षांत व्हि.आय.पी. व्यक्तींच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1,066 तर 2018 मध्ये तब्बल 1,715 व्हि.आ.पी. दौऱ्यांची नोंद आहे. हे दौरे 2014 मध्ये 445, 2015 मध्ये 605 आणि 2016 मध्ये 648 इतके होते.

वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी
शहरातून दररोज सहा ते सात दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. गेल्या वर्षी पुणे शहर परिसरातून 1,757 दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. तसेच 59 तीनचाकी आणि 150 चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे, अशी कबुली डॉ. के. वेंकटेशम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 2017 मध्ये शहरातून 2,212 वाहने चोरीला गेली होती. 2018 मध्ये 1,966 वाहने चोरीला गेली आहेत. वाहन चोरीचे गुन्हे कमी झाले असले तरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण केवळ 29 टक्‍के एवढे आहे. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेतील सर्व पथके तसेच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन चोरी रोखण्यासाठी ज्या भागातून वाहने चोरीला जातात. अशा भागांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)