मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 13 जून पासून जिल्हावार बैठका घेणार आहेत. 13, 14,15 20 आणि 21 जुन रोजी या बैठका होणार आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाचे विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी आजी-माजी महापौर, आणि अन्य लोकप्रतिनिधींना त्यांनी आमंत्रित केले आहे.
गेल्या विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 41 जागा जिंकल्या आहेत तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांचे चार खासदार निवडून आले आहेत. या बैठकीत सक्षम उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जाईल. राज्यात कॉंग्रेस बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असून त्यात पक्षाच्या वाट्याला 144 जागा येतील अशी पक्षाची अपेक्षा आहे. यात त्यांना अन्य मित्र पक्षांनाहीं सामाऊन घ्यावे लागणार आहे.
13 जुनला पहिल्या दिवशी ते मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मिरा भायंदर, भिवंडी, पालघर, वसई विरार, पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग, उल्हासनगर, आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापुर, सोलापुर आणि सांगलीच्या पदाधिकाऱ्यांना ते 15 जून रोजी भेटणार आहेत.