महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 

दुसरा टप्प्यात देशभरात 13 राज्यांतील 97, तर महाराष्ट्रात 10 मतदारसंघात आज मतदान 
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली/मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यानंतर उद्या, गुरुवारी 18 एप्रिल रोजी देशभरातील 13 राज्यांतील 97 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 मतदारसंघाचा समावेश असून यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी केंद्रिय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, डॉ. प्रीतम मुंडे आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान प्रक्रिया निर्भयपणे आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्म-काश्‍मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पुडूचेरी, तामिळनाडू, त्रिपूरा, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या 13 राज्यांतील 97 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा 10 मतदारसंघाचा समावेश आहे. दहाही ठिकाणी चुरशीची लढत असल्याने उद्याच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील लढतीमध्ये 179 उमेदवार निवडणूकीच्या रणांगणात उतरले असून 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार त्यांचे राजकिय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त करणार आहेत. महाराष्ट्रातील 10 मतदारसंघात 20 हजार 716 मतदान केंद्र असून त्यापैकी 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. ही निवडणूक शेवटची असल्याचे जाहीर करून कॉंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विजयासाठी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. तर माजी खासदार प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रथमच सोलापूरमधून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सलग दुसऱ्यांदा लोकसभा लढवत असून त्यांना नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव पाटील-चिखलीकर यांचे आव्हान आहे. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे तर अमरावतीत माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा यांच्यात चुरस आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक 36 उमेदवार बीडमध्ये, तर सर्वात कमी म्हणजे 10 उमेदवार लातूर लोकसभा मतदारसंघात आहेत.

दुसऱ्या टप्प्प्यातील अन्य महत्त्वाच्या लढती..

बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिवसेना) विरूध्द डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस). अकोला : संजय धोत्रे (भाजप) विरूध्द हिदायत पटेल (कॉंग्रेस). हिंगोली : सुभाष वानखेडे (कॉंग्रेस) विरूध्द हेमंत पाटील (शिवसेना). परभणी : संजय जाधव (शिवसेना) विरूध्द राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस). उस्मानाबाद : ओमराजे निंबाळकर (शिवसेना) विरूध्द राणा जगजीतसिंह पाटील (राष्ट्रवादी). लातूर : मच्छींद्र कामत (कॉंग्रेस) विरूध्द सुधाकर शृंगारे (भाजप). 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)