शहरात पाणीपुरवठ्यावरून बोंबाबोंब होण्याची शक्‍यता

पाणीपुरवठा करणारे निवडणुकीच्या कामात

नगर – लोकसभा निवडणूक प्रक्रियेत बहुतांशी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली असतांना आता निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकेतील अधिकाऱ्यांना यापूर्वीच निवडणूक कामांची जबाबदारी टाकली असतांना शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉलमन यांनी नियुक्‍ती करण्यात आल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावरून शहरात बोंबाबोंब होण्याची शक्‍यता

पाणीपुरवठा विभागातील पाणी सोडणाऱ्या व्हॉलमनची निवडणूक प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सोडण्यात अडचणी येणार असून त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. निवडणुकीचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. विविध कामांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडूनही निवडणूक शाखेने कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती. अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर कर्मचाऱ्यांची नावे पाठविण्याच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार यादी तयार करण्यात येवून निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आली. निवडणूक विभागाने वर्ग चारमधील 197 कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्यांचे आदेश बजावले आहेत. बुधवारी संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश बजावण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाची झोप उडाली.

पाणीपुरवठा विभागातील तब्बल 40 ते 45 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती निवडणुकीच्या कामकाजासाठी करण्यात आली आहे. दि. 7 व 8 रोजी प्रशिक्षण व त्यानंतर 22 व 23 एप्रिल रोजी प्रत्यक्ष निवडणुकीवेळी या कर्मचाऱ्यांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. नियुक्‍ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांशी कर्मचारी हे दैनंदिन पाणीपुरवठा सेवेशी निगडीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याची विनंती पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांमार्फत निवडणूक विभागाकडे केली होती.परंतू एकदा नियुक्‍ती देण्यात आल्यानंतर ती रद्द करता येणार नाही असे निवडणूक शाखेने स्पष्ट केल्याने पाणीपुरवठा विभाग अस्वस्त झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम सुरू केले तर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवून शहरात बोंबाबोंब होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)