व्यावसायिकांना ऑनलाईन प्रक्रियेसाठी करावा लागणार जास्त खर्च
मोजक्या ठिकाणी ऑनलाईन यंत्रणा सुरू
पूर्वी मॅन्युअल असलेली ही यंत्रणा ऑनलाईन झाल्याने त्याला कार्यान्वित करण्यासाठी वेळ लागणार आहे. यासाठी सुरवातीला शहरातील काही ठिकाणीच यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आजवर शहरात मोजक्या काही ठिकाणीच ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाली आहे. यामुळे शहरभर यंत्रणा सुरू होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी – प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनास “पोल्यूशन अंडर कंट्रोल’ तपासणी (पीयूसी) करुन घेणे बंधनकारक आहे. पीयूसीसाठी आकारण्यात येणारा दर वाढण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून ही यंत्रणा ऑनलाईन करण्यात आल्याने पीयूसी चालकांना कॅमेरा, इंटरनेट आदी तांत्रिक उपकरणांची सोय करावी लागणार आहे. ही प्रक्रिया खर्चिक असून यामुळे काही प्रमाणात पीयूसीचा दर वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार पीयूसी अर्थात “पोल्यूशन अंडर कंट्रोल’ ही यंत्रणा ऑनलाईन करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात आरटीओ प्रशासनाने केंद्र संचालकांची बैठक घेऊन तशा सूचनाही दिल्या आहेत. आजवर ही प्रक्रिया मॅन्युअली होती. मात्र, नव्या नियमानुसार ही यंत्रणा ऑनलाईन होणार असून तपासणी केलेल्या वाहनांचे छायाचित्रही अपलोड करावे लागणार आहे. यामुळे केंद्र संचालकाला इंटरनेट, कॅमेरे, ई- उपकरणे खरेदी करुन त्याचे नियोजन आहे. यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून ते आरटीओ कार्यालयाशी जोडावे लागणार आहे.
ही प्रक्रिया वेळखाऊ असून याला काही दिवस लागणार आहेत. मात्र, या प्रक्रियेमुळे केंद्र चालकांचा खर्च वाढणार असून पर्यायाने वाहनचालकांनाही पीयूसीसाठी जादा खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच, यापूर्वी 2011 साली दर वाढवण्यात आले होते. यामुळे दरवाढीच्या शक्यतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. मात्र, दरवाढ करण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात येत असून त्याबाबतचे सर्व अधिकार परिवहन आयुक्त कार्यालयाला आहेत.