पुणे – नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाची अखेर वाटचाल सुरू झाली असून मान्सूनने गेल्या 24 तासांत पंजाब आणि हरियाणाच्या उर्वरित भागांत तसेच पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. या प्रगतीमुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून गुरुवारी (दि.18) कोकण-गोव्यातील काही भागांत जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामध्ये वेंगुर्ला येथे सर्वाधिक 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कणकवली येथे 110, मुल्दे परिसरात 100, कुडाळ आणि गगनबावडा येथे 90, दोडामार्गमध्ये 80, महाड, पणजी आणि वैभववाडी येथे प्रत्येकी 70, माणगाव, पोलादपूर आणि लोणावळा परिसरात 60 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत कोकणात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
शहरात कमाल तापमानात वाढ
मागील दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून बुधवारी (दि. 17) कमाल तापमान 31 अंशांपर्यंत गेले होते. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता. पुढील दोन दिवस पावसाची उघडीप असेल. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दोन दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे.