पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या सुरस आणि दुजाभावाच्या अनेक कहाण्या समोर येत असताना आता गरीब आणि श्रीमंत आंदोलकांसाठी केलेल्या दुजाभावामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. उचभ्रू नागरिकांना आंदोलनासाठी पालिकेच्या आवारात जागा उपलब्ध करून देणाऱ्या पालिकेने सर्वसामान्य गोरगरीब आंदोलकांना मात्र गेटवरच अडविल्याचा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. या पक्षाकडून तसेच प्रशासनाकडून अनेक ठिकाणी दुजाभाव करण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. विविध कामांसाठी दुजाभाव करणाऱ्या सत्ताधारी भाजपाने आणि पालिका प्रशासनाने गरीब आणि उच्चभ्रु असा दुजाभाव केल्यामुळे या प्रकाराची सध्या चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यमनगर येथे एसआरए व पंतप्रधान आवास योजनेतून घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. या ठिकाणी या कामासाठी भूखंडही आरक्षित आहे. मात्र उद्यमनगर येथील स्थानिक रहिवाशांचा या
प्रकल्पाला विरोध आहे.
मासुळकर कॉलनी व उद्यमनगर येथील स्थनिक उच्चभ्रू रहिवाशांनी 13 मे रोजी पालिकेवर मोर्चा काढत या प्रकल्पाला विरोध दर्शवित आंदोलन केले होते. या आंदोलकांना पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पालिकेचे गेट उघडून मुख्य प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर आंदोलन करण्यास मुभा दिली होती. तर 15 मे रोजी हा प्रकल्प व्हावा यासाठी झोपडपट्टीतील नागरिक व शहरातील विविध संघटनांनी आंदोलन केले होते.
या आंदोलकांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी गेटबाहेरच अडविले व पालिकेत जाण्यास मज्जाव केला. आंदोलकांना सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर या ठिकाणी शाब्दिक बाचाबाचीही झाली मात्र आंदोलकांना आतमध्ये प्रवेश देण्यात आलाच नाही. पालिकेच्या बाहेरच आंदोलकांना आपले आंदोलन संपुष्टात आणावे लागले. एकाच प्रकल्पासाठी झालेली दोन आंदोलने आणि पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी केलेला दुजाभाव हा चर्चेचा विषय बनला आहे. गरीब आणि उच्चभ्रू असा दुजाभाव केल्यामुळे सत्ताधारी भाजपाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.