वाईचे राजकारण बदलाच्या वळणावर ?

अनिल काटे

मेणवली – आमदार मकरंद पाटलांच्या मजबूत जनसंपर्कामुळे आजही संपूर्ण वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याचे बोलले जात आहे. तरी राष्ट्रवादीचे वर्चस्व संपवण्यासाठी शिरवळ, लोणंद, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्‍वर व वाई तालुक्‍यातील सर्वपक्षीय काही प्रमुख शिलेदारांच्या खाजगी बैठकातून नेतृत्व बदलाची भाषा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेबरोबरच वाई विधानसभेचे राजकारण बदलत्या वळणावर जात असल्याने राजकीय बदलाचे चाहूल देणारे वारे येणाऱ्या निवडणुकीत कोणते वळण घेणार याची उत्सुकता वाई विधानसभा मतदार संघातील जनतेला लागून राहिली आहे.

लोकनेते किसनवीर आबा, यशवंतराव चव्हाण यांच्या कॉंग्रेस विचारांचा प्रभाव असणारा वाईच्या मतदार संघावर नेहमी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य राहिले आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2004 मधील निवडणुकीचा अपवाद वगळता वाई विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षे राष्ट्रवादीने मतांच्या चढत्या क्रमाने कायमच अबाधित राखलेले वर्चस्व 2019 लाही कायम राहील असे म्हटले जात असले तरी राष्ट्रवादीला धोबीपछाड करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नाराज शिलेदारांसह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गेली काही दिवसांपासून सुरू केल्याचे खात्रीशीर बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संपूर्ण मतदारसंघात आमदार मकरंद आबांचा जादुई करिष्मा असला तरी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या अंतर्गत बंडाळी व नाराजीमुळे लोणंद, खंडाळा, शिरवळ व वाईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत काहीअंशी तोटा सहन करावा लागला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या हेकेखोरपणामुळे मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे जाणवते. नेमकी हीच नाराजी ऐन निवडणुकीत उफाळून येण्याची दाट शक्‍यता सुज्ञ मतदारातून वर्तवली जात आहे.

आजपर्यंत वाई मतदारसंघातील प्रत्येक सत्तेचे राजकारण भुईंजसह बावधन व बोपेगाव या तीन मोठ्या गावातील एकाच कुटुंबाभोवती फिरत राहिल्याने अनेक कार्यकर्त्याच्या इच्छा आकांक्षा नकळत दाबल्या गेल्याने सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषदपर्यंतच थांबावे लागत असल्याची दुःखद भावना खाजगीत व्यक्त केल्या जात आहेत. यातूनही काही मंडळींनी बंडखोरीचे उपसलेले हत्यार कुठला पक्षीय आधार नसल्याने म्यानबंद करावे लागत होते तर कधी केले जात होते. सध्या वाईच्या मतदारसंघात कमळाबाईचा वाढता प्रभाव पाहता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराज शिलेदारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी म्यानबंद केलेले बंडखोरीचे हत्यार यावेळी कमळाबाईच्या आधारावर पुन्हा उपसण्याची तयारी नाराजांचे गठबंधन एकजुटीने करत असल्याची जोरदार चर्चा शिरवळ व्हाया खंडाळा, वाईसह महाबळेश्‍वरपर्यंत ऐकायला मिळत आहे. वाई मतदार संघातील घड्याळाचे “सेल’ काढण्यासाठी नाराजांच्या नेतृत्वाची एकत्र बांधली जात असलेली गठबंधनाची “गाठ’ घड्याळाच्या काट्याचा वेग थांबवून बंद पाडण्यात यशस्वी होणार का? हे आगामी काळच ठरणार आहे.

कॉंग्रेसची दादा मंडळी हातात घेणार कमळाचे फुल

वाई विधानसभा मतदारसंघात तळागाळात कॉंग्रेस पक्षाला मानणारा कार्यकर्ता व मतदार मोठा आहे. परंतु नेतृत्वाचे पाठबळ मिळत नसल्यामुळे हातातील घड्याळ्याची टिकटिक वाढत गेली असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असले तरी घड्याळाची वाढती टिकटिक थांबवण्यासाठी कॉंग्रेस पक्षातील काही “दादा’ मंडळी आपल्या हातात “कमळाचे’ फुल घेणार असल्याची चर्चा वाई मतदारसंघात जोरात सुरू असून ती कितपत खरी खोटी याचा अंदाच अजून कोणालाच येत नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)