अवनी हत्या प्रकरणाचे राजकारण होतेय : सुधीर मुनगंटीवार

पिडीत कुटुंबियांना मिळणारी मदत 10 लाखावरून 15 लाख

मुंबई: अवनी वाघिणीच्या हल्ल्यात 13 बळी गेल्यामुळे त्या भागात शेतकरी, आदिवासींत दहशत होती. त्या वाघिणीला ज्यांनी गोळी घातली तेच शिकारी आधीच्या सरकारकाळातही नरभक्षक वाघांचा उपद्रव झाला तेव्हा मान्यता असलेले होते. पुर्वीच्या सरकार काळात दोन वेळा वाघांना मारण्यात आले. त्यामुळे आता अवनी वाघिणीच्या संदर्भात बोलणारे या विषयाचेही राजकारण करीत आहेत, असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना लगावला. वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत 10 लाखावरून 15 लाख रुपये करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याची पद्धत चुकली, इंजेक्‍शन तिच्या स्नायूत गेले नसल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालावरून निदर्शनास आले. शिकारी असगर अली यांनी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा नियम मोडला आदी मुद्दे या लक्षवेधीत मांडण्यात आले होते. यावेळी सभागृहात गदारोळ सुरू होता. त्यातच सदर लक्षवेधी मांडली.

मुनगंटीवार उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस गटनेते जयंत पाटील यांच्याशी त्यांची शाब्दीक टोलेबाजीही होत होती. वाघिणीला मारण्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) यांचे मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले किंवा कसे याची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने व प्राधिकरणाने समिती गठीत केली आहे समिती आपला अहवाल सादर करील, असेही ते म्हणाले.

वाघांची संख्या राज्यात 203 इतकी आहे. 2016 ते 15 नोव्हेबरपर्यंत 50 वाघांचे विविध कारणांनी मृत्यू झाले अशी आकडेवारीही त्यांनी दिली. रिलायन्स कंपनीला जमीन देण्यासाठी अवनी वाघिणीला मारले हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ती जागा देण्याचा निर्णयही पुर्वीच्या सरकारने घेतला व ती जागी अवनीच्या मृत्यूच्या जागेपासून 60 कि.मी. इतक्‍या दूर आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)