पिस्टल बाळगणाऱ्या युवकास अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन जिवंत काडतुसे जप्त

सातारा – अवैध पिस्टल बाळगणारा युवक कराड येथून साताऱ्याकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचनांनुसार एलसीबीच्या पथकाने रुपेश संजय वारे (रा. कराड) याला पोवई नाका ते गोडोली जाणाऱ्या रोडवर ताब्यात घेतला.

अधिक माहिती अशी की, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या लोकांच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यातील अशा लोकांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवार दि. 18 रोजी कराडवरून एक युवक अवैध पिस्टल घेवून साताऱ्याला एसटी बसने येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना बातमीदाराकडून कळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. जऱ्हाड यांनी बसस्थानक व पोवई नाका परिसरात सापळा लावला होता. मात्र, संशयित हा सापळ्यात अडकला नसल्याने पोलिसांनी शहरातील काही भागात त्याचा शोध घेण्याची मोहिम राबवली. अखेर संशयिताला पोवई नाका ते गोडोली जाणाऱ्या रोडवर एका हॉस्पिटलसमोर एलसीबीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली.

त्यावेळी त्याने एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडील बॅगेत असल्याची कबुली दिली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सिध्देश्‍वर बनकर, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, विक्रम पिसाळ, विशाल पवार, निलेश काटकर, पंकज बेसके यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)