पंतप्रधानांच्या फोटोमुळे एअर इंडियाचे बोर्डिंग पास मागे

नवी दिल्ली: नुकतेच पंतप्रधानांचे फोटो छापलेल्या रेल्वेच्या तिकिटांमुळे विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केली गेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची छायाचित्रे छापलेली असल्यामुळे एअर इंडियाचे बोर्डिंग पास वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे बोर्डिंग पास मागे घेण्यात येणार आहेत.

बोर्डिंग पासवरील पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो हे “थर्ड पार्टी’च्या जाहिरातीत आहेत. मात्र यामुळे जर आदर्श आचार संहितेचा भंग होत असेल, तर हे बोर्डिंग पास मागे घेतले जातील, असे एअर इंडियाने म्हटले आहे. पंजाबचे माजी पोलिस महासंचालक शशी कांत यांनी आज या दिल्लीतून दिल्या गेलेल्या या बोर्डिंग पासचे फोटो ट्‌विटरवर पोस्ट केले आणि या दोन्ही नेत्यांचे फोटो त्यावर प्रसिद्ध करण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या नेत्यांचे फोटो बोर्डिंग पासवर छापल्यामुळे निवडणूक आचार संहितेचा भंग होतो आहे. निवडणूक आयोगावर आपण उगीचच पैसे खर्च करतो आहोत, असे शशी कांत यांनी ट्‌विटरवर म्हटले होते.

हे बोर्डिंग पास गुजरातमध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या “व्हायब्रंट गुजरात’ गुंतवणूक परिषदेच्यावेळी छापले गेले असावेत. या दोन्ही नेत्यांचे फोटो त्याच परिषदेच्या जाहिरातीच्या निमित्ताने छापले गेले असावेत. शिल्लक राहिलेले बोर्डिंग पास आता वापरात आणले गेले असावेत, असे एअर इंडियाचे प्रवक्‍ते धनंजय कुमार यांनी सांगितले.

हे बोर्डिंग पास केवळ गुजरातसाठी नाहीत, तर पूर्ण देशासाठी आहेत. “थर्ड पार्टी’ जाहिराती आचार संहितेच्या कक्षेमध्ये येऊ शकतात का, याची तपासणी केली जाईल. जर तसे असेल तर हे बोर्डिंग पास मागे घेतले जातील, असे कुमार यांनी सांगितले. यापूर्वी 20 मार्च रोजी पंतप्रधानांची छायाचित्रे असलेल्या रेल्वे तिकिटांबाबत तृणमूल कॉंग्रेसने तक्रार केल्यावर ही तिकिटेही मागे घेतली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)