“राम की जन्मभूमी’चित्रपटाचे प्रदर्शन निर्विघ्न 

प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

नवी दिल्ली – “राम की जन्मभूमी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अयोध्येतील राममंदिराच्या मुद्दयावरील या चित्रपटाचा आणि अयोध्येतील जमिनीच्या मालकीवादासंदर्भात सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रक्रियेमध्ये काहीही संबंध नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. अयोध्येतील जमिनीच्या वादाप्रकरणी मध्यस्थांकडून सुरू असलेल्या वाटाघाटींवर या चित्रपटामुळे प्रभाव पडेल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा दावा अमान्य केला आणि या प्रकरणावरील याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी करण्याचे निश्‍चित केले.

त्यानंतर दिल्लीतील उच्च न्यायालयानेही अशाच प्रकारच्या एका अन्य याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल, असा कोणताही उल्लेख न्यायालयासमोर आलेला नाही, त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचिकाकर्त्यांना स्वतंत्रपणे हा चित्रपट दाखवावा, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने केली आहे. अखेरचे मुगल बादशाह बाहदुर शाह झफर यांचे वंशज असलेल्या युवराज याकुब हबिबुद्दीन तुकी यांनी ही याचिका दाखल केली होती. “राम की जन्मभूमी’ हा चित्रपट उद्या (29 मार्च) प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)