चुका करणाऱ्या राज्यकर्त्यांना जनतेने माफ केलेले नाही

डॉ. भारत पाटणकर : 2 मार्चला मुंबईच्या दिशेने 50 हजारांचा लॉंगमार्च

सातारा – आम्ही आमच्या घरांना सोन्याची कौले मागत नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासाची अन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची मागणी करतोय. त्यासाठी आता 2 मार्च मुंबईच्या दिशेने लॉंगमार्चला सुरूवात होणार आहे. मात्र, दरम्यानच्या कालावधीत काही बरे वाईट झाले तर जनता राज्यकर्त्यांना कधी ही माफ करणार नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, अशा शब्दात डॉ.भारत पाटणकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त व दुष्काळग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. पार्श्‍वभूमीवर डॉ.भारत पाटणकर यांनी आंदोलस्थळी भेट देत आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे अति.मुख्यसचिव प्रविणसिंह परदेशी यांनी आठ दिवसांमध्ये बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, जो पर्यंत लेखी पत्र मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. 1 मार्च रोजी कोयनानगर, ता.पाटण येथे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त एकत्रित येणार आहेत. त्यानंतर 2 मार्चला मुंबईच्या दिशेने लॉंगमार्चला सुरूवात होईल. त्यामध्ये किमान 25 हजार लोकांचा समावेश असेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे पनवेल येथे लॉंगामार्च पोहचल्यानंतर रायगड, रत्नागिरीचे प्रकल्पग्रस्त एकत्रित येवून संख्या 50 हजारांची होईल. असे सांगून डॉ.पाटणकर म्हणाले, प्रकल्पग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांना कायम चालण्याची, ओझे वाहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे शाररिक त्रासाची चिंता नाही. परंतु आता त्यांच्या डोळ्यात निर्माण झालेले अश्रुंच्या ठिणग्या झाल्या आहेत. त्या रस्त्यावर पडण्याची वाट सरकारने पाहू नये. एकदा लॉंगमार्चला सुरूवात झाल्यानंतर सरकारने बैठक आयोजित करण्याचे निमंत्रण देण्यात अर्थ उरणार नाही.

सरकारकडे आम्ही जो विकासाचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्य समृध्द होणार आहे. मुंबई झोपडपट्ट्या मुक्त होईल. दुष्काळ निवारणासाठी आटपाडी पॅटर्न राज्यभर अंमलबजावणी करण्याची मागणी करित आहोत. समन्यायी विकास व सर्वांचा विकास धोरण राबविण्याची मागणी करतोय. सिंचनाच्या मुद्दयावर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तसेच पुनर्वसनाच्या प्रश्‍नावर महसूल यंत्रणेने माहिती तयार केली आहे. त्यामुळे आता तात्काळ बैठकीची तारीख निश्‍चित होणे गरजेचे आहे. अन्यथा 2 मार्चला लॉंगमार्चला सुरूवात होईल, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.

प्रकल्पबाधित शोधण्याचे काम त्यांचे

दरम्यान, डॉ.भारत पाटणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली. ते म्हणाले, जिल्हाधिकारी अज्ञानी व बेजबाबदार आहेत. आपण जो लाख रूपयांचा पगार घेतो तो शेतकऱ्यांच्या घामातून मिळतो, हे लक्षात घेवून शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे. कोयनेचे प्रकल्पबाधित शोधण्याचे काम त्यांचे होते. मात्र, उलट अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही कृती त्यांना कायद्याचे अज्ञान असल्यामुळे झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी जे तोंडी सांगत आहेत ते त्यांनी लेखी द्यावे, असे आवाहन डॉ.पाटणकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)