जनतेनेच बॅनर लावून दिला विकासकामांचा पुरावा

आमदार शंभूराज देसाई यांचा विक्रमसिंह पाटणकरांना टोला

विकासकामांचे मूल्यमापन जनता करेल
आपण केलेली विकासकामे ही जनतेला उघडपणे दिसत आहेत. तरीही पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र हे आपला विकास कुठेच दिसत नाही, हा कागदावरचा विकास आहे. अशा खोट्या वल्गना करीत असले तरी माझ्या विकासकामांचे व पाटणकर पितापुत्रांच्या निष्क्रीयतेचे मूल्यमापन जनता निवडणूकीतच करणार असल्याने कामाचा कोण आणि बिनकामाचा कोण हे आगामी निवडणुकांमध्ये जनताच ठरविणार आहे.

सणबूर – शंभूराजेंना गावे पण माहिती नाहीत, असे सांगणारे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर दादा शंभूराजेना तालुक्‍यातील गांवे माहिती नसती तर तालुक्‍याच्या गावागावात आणि वाडीवस्तीवर याच गत साडेचार वर्षात मी केलेल्या विकासकामांचे बॅनर गावातील जनतेने लावले नसते. तुमच्या बालेकिल्लयात तर माझ्या विकासकामांचा पुरावा या विभागातील जनतेनेच तुम्हाला भलेमोठे बॅनर लावून दिला आहे, असा प्रतिटोला आ. शंभूराज देसाई यांनी लगावला.
घोट, ता. पाटण येथे हरीतऊर्जा योजनेतंर्गत घोट ते जन्नेवाडी गावपोहोच रस्त्याचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, शंभूराज युवा संघटना उपाध्यक्ष अभिजीत पाटील, शिवदौलत बॅंक संचालक संजय देशमुख, माणिकराव पवार, विजय पवार फौजी, उत्तमराव मगर, घोट सरपंच मधूकर आरेकर, उपसरपंच पुष्पाताई शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह घोट, जन्नेवाडी, जुगाईवाडी, फडतरवाडी व बोर्गेवाडी येथील कार्यकर्ते, युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. देसाई म्हणाले, पाटण तालुक्‍यातील डोंगरपठारावर विकास करताना आम्ही विरोध करीत होतो, असे पाटणकरदादांचे म्हणणे आहे. आम्ही कोणत्या विकासकामांना विरोध करीत होतो, हे पाटणकरांना चांगलेच माहिती आहे. ज्या ठिकाणी भविष्यात पवनचक्कया येणार आहेत. त्याठिकाणी यांचा विकास सुरु होता. हे मतदारसंघातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. पाटणकरांना आमदार असताना पवनचक्‍क्‍या ज्याठिकाणी उभारल्या जाणार होत्या, तेवढी गावे दिसली. घोटच्यावर असणारी जन्नेवाडी त्यांना दिसली नाही.

याच जन्नेवाडीला आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पहिल्यांदा रस्ता दिला त्यावर पाटणकरांना एवढ्या वर्षात एक रुपयांचा निधी टाकता आला नाही. डोळ्याला दिसेल असे एकही काम त्यांना पाटण मतदारसंघात त्यांच्या आमदारकीच्या काळात करता आले नाही. पाटणकरांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी आपल्यावरील आरोपाचे उत्तर हे मतदारसंघातील जनतेने शोधून ठेवले आहे. योग्य वेळी त्याचे उत्तर जनताच त्यांना देणार आहे.वाड्यात बसून पत्रके काढणे एवढा एकमेव उद्योग त्यांचेकडे शिल्लक राहिला आहे. प्रास्ताविक रणजित शिंदे यांनी केले. आभार भानूदास शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)