खेडची जनता राष्ट्रवादीच्या मागे ठाम

चिंबळी – खेड तालुक्‍याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना जर अटक झाली, तर मराठा समाज व मोहितेंचे सर्वच समाजातील समर्थक शांत बसणार नाही. ज्यांचा हा डाव आहे, त्यांना त्याचे फळ नक्‍कीच येत्या निवडणुकीत मिळेल. राहता राहिला निवडून येण्याचा प्रश्‍न तर त्या वेळेस आत असो वा बाहेर जनता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे ठाम उभी असल्याने मोहिते पुन्हा आमदार होणारच, असा ठाम विश्‍वास खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, संचालक विलास कातोरे यांनी व्यक्‍त केला.

चिंबळी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 22) मोहितेंच्या समर्थनार्थ व दाखल गुन्ह्याविरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कातोरे बोलत होते. तद्‌नंतर भैरवनाथ चौकात एकत्र येत मोहिते सर्मथकांनी दिलीप मोहिते जिंदाबाद, राजकीय षड्‌यंत्राचा निषेध असो, अशा घोषणा व फलक झळकावले. यावेळी सोसायटी अध्यक्ष अर्जुन जाधव, माजी आदर्श सरपंच आप्पासाहेब लोखंडे, माजी सरपंच अर्जुन अवघडे, माजी उपसरपंच हेमंत जैद, संतोष कातोरे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कड, श्रीरंग बनकर, दादासाहेब जैद, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, बाळासाहेब जाधव, सुरेश जगनाडे, अंकुश बटवाल, हिरामण जैद, सत्यवान जैद, गुरूदास उंबरकर, लंकेश पाटारे, प्रवीण चव्हाण, पंडित कड, अर्जुन कातोरे, अरुण जैद, कैलास कातोरे, राहुल चव्हाण, हिरामण बहिरट, आकाश जैद, नेमीनाथ बटवाल, संभाजी अवघडे उपस्थित होते.

विलास कातोरे म्हणाले की, जवळपास वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोहितेंवर अटकेची कारवाई का? मराठा समाज एवढा वेडा नाही समाजाला कळतंय की, ही सर्व राजकीय षड्‌यंत्रे आहेत. मोहितेंना जेलमध्ये टाकून निवडणुकीत आत सडत ठेवण्याचा व निवडणूक जिंकण्याचा काही राजकीय नेत्यांचा डाव आहे, त्यासाठी सत्तेचा गैरवापर झाल्याची देखील शक्‍यता आहे. मोहिते वैयक्तिक कारणासाठी मोर्चात सहभागी झाले नव्हते, तर मराठा समाजाच्या न्याय व हक्‍कासाठी सहभागी झाले होते; परंतु त्यांच्या सहभागाचा त्रास झालेल्या काही राजकीय नेत्यांनी त्यांना जाणूनबुजून यात गोवले. पकडलेले गुन्हेगार व साक्षीदार यांचे मोहितेंशी संबंध असल्याचे जाणून बुजून खोटे पुरावे तयार केले, असा आरोप आज मराठा समाज करीत असल्याचे त्यांनी
नमूद केले.

हे शिवसेनेचे राजकीय षड्‌यंत्र
दिलीप मोहिते यांच्यावर चाकण येथील मराठा मोर्चा दरम्यान घडलेल्या हिंसाचारात दोषी असल्याबाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा हे शिवसेनेचे राजकीय षड्‌यंत्र असून, यात शिवसेनेच्या आमदार व माजी खासदारांचा हात असल्याची भावना मोहिते समर्थकांमध्ये असल्याचे विलास कातोरे यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)